परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा; ५५६ स्थानकांचे नूतनीकरण 

राज्यातील बस स्थानके आणि आगारांच्या स्वच्छतेसाठी संपूर्ण राज्यात मिळून एकच निविदा काढणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

यवतमाळ जिल्ह्य़ाच्या आर्णी तालुक्यातील बस स्थानकामधील गैरसोयींबाबत ख्वाजा बेग यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना रावते यांनी ही घोषणा केली. राज्यातील बहुतांश एसटी स्थानके आणि आगारांमध्ये अस्वच्छता असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. या पाश्र्वभूमीवर सर्व स्थानकांमध्ये चांगली स्वच्छता ठेवण्यासाठी एकच निविदा काढली जाईल आणि त्यामध्येही ढेकणांचा त्रास दूर करण्यासाठी काळजी घेतली जाईल, असेही रावते यांनी स्पष्ट केले. स्थानकांमध्ये सगळीकडे पान-तंबाखूच्या पिचकाऱ्या दिसतात. त्याला रोखण्यासाठी तंबाखूमुक्त एस.टी.कडे वाटचाल सुरू असून बस स्थानकांवर तंबाखूची विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बस वाहक-चालकांना आणि एस.टी. कर्मचाऱ्यांना तंबाखू न खाण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून यापुढे तंबाखू खाणाऱ्यांना नोकरी देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चालकांच्या आणि कर्मचाऱ्यांसाठी सोयीसाठी आगार परिसरात विश्रामगृहाची उत्तम सोय करणार असल्याचेही रावते यांनी या वेळी सांगितले. राज्यात ५५६ बस स्थानकांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला असून टप्प्याटप्प्याने ही स्थानके अत्याधुनिक सुविधांनी युक्त केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.