तंत्रशिक्षण संचालनालयाकडूनही चौकशी

‘सिंहगड एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट’च्या वडगाव, कोंडवा, नऱ््हे आणि लोणावळा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील अध्यापकांचे सात महिन्यांचे थकीत वेतन मिळण्यासाठी आंदोलन सुरूच असून जोपर्यंत पूर्ण वेतन मिळणार नाही तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात भरली जाणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन चालून राहील, असा निर्धार लोणावळा येथील अध्यापकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या पथकाने शुक्रवारी वडगाव येथील संस्थेच्या महाविद्यालयात जाऊन चौकशी केली.

सिंहगड संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांप्रमाणेच स्प्रिंगफिल्ड शाळेतील शिक्षकही आंदोलनाच्या विचारात असून यापुढे आम्हाला देण्यात येणारे वेतन ‘आनंद सहकारी बँकेत’ जमा न करता राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्याची मागणीही लोणावळा येथील अध्यापकांनी केली आहे. या अध्यापकांनी याबाबतचे पत्रच व्यवस्थापनाला दिले असून आता माघार नाही, ही त्यांची भूमिका आहे. तंत्रशिक्षण संचालक डॉ. सु. का. महाजन यांच्या आदेशानुसार पुणे येथील संचालनालयातील तांबे, जोशी व जगताप यांच्या समितीने वेतनासह एकूणच संस्थेतील सध्याच्या प्रश्नांबाबत वडगाव येथील महाविद्यालयात जाऊन चौकशी केली. या समितीने येथील प्राचार्याची भेट घेऊन संस्थेतील आंदोलनाबाबत विचारणा केली. तथापि ही चौकशी म्हणजे एक फार्स असल्याचा आरोप येथील अध्यापकांनी केला आहे. कोंडवा, वारजे, वडगाव तसेच लोणावळा येथे महाविद्यालय सुरू असताना थेट वर्गात जाऊन पाहणी केली असती तर संचालनालयाच्या समितीला वस्तुस्थिती अधिक स्पष्ट दिसली असती. प्राचार्याकडे चौकशी करून जर ही समिती अहवाल लिहिणार असेल तर प्रश्नच मिटला असे अध्यापकांचे म्हणणे आहे.

आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर केवळ एक बेसिक पगार देण्यात आला असून तोही आंनद सहकारी बँकेतून पूर्णपणे रोखीने काढता येत नाही. केवळ एकावेळी पाच हजार रुपयेच काढता येतात तेही वरिष्ठांच्या मेहेरबानीवर अवलंबून असल्याचे लोणावळा येथील अध्यापकांचे म्हणणे आहे. सुमारे अडीचशे कर्मचाऱ्यांचे चेक न वटल्याची घटनाही घडली होती. आता सात महिन्यांचे पूर्ण वेतन मिळाल्याशिवाय माघार नाही, असे येथील अध्यापकांचे म्हणणे आहे. कोंडवा येथे अध्यापकांचे आंदोलन झालेलेच नाही, असे येथील प्राचार्याचे म्हणणे असून नियमितपणे वेतनही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणतेही आंदोलन नाही

संस्थेच्या कोणत्याही महाविद्यालयात काम बंद आंदोलन सुरू नाही. आनंद सहकारी बँकेमधून कितीही रकमेचा चेक काढता येतो. काही लोक संस्थेविषयी खोटी माहिती देत असून सरकारने पैसे दिल्यानंतर पगार दिला जाईल. तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाच्या चौकशीतून योग्य ती माहिती कळेलच.

-मारुती नवले