20 February 2019

News Flash

बँक ऑफ महाराष्ट्रचे ३८ कोटी थकवले

एकीकडे शिक्षकांना वेळेवर वेतन दिले जात नसताना लोणावळा येथील संस्थेच्या जागेत ‘गोल्फ क्लब’चे काम मात्र जोरात सुरू होते.

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीवर जप्तीची नोटीस!

पुण्याच्या ‘सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी’च्या अभियांत्रिकी महाविद्यालयांसह विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षकांना नियमित व पूर्ण वेतन मिळत नसतानाच, तब्बल ३८ कोटी ४१ लाख ४८ हजार रुपये थकविल्याबद्दल ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने संस्थेच्या मावळ तालुक्यातील जागांवर जप्ती आणली आहे.

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची वडगाव, नरे, वारजे, कोंडवा तसेच लोणावळा येथे अभियांत्रिकी महाविद्यालयांसह विविध महाविद्यालये तसेच शाळा असून संस्थेत जवळपास साडेआठ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. २०१२ पासून यातील काही महाविद्यालयात नियमित वेतन मिळणे बंद झाले. त्यानंतर बहुतेक सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अनेक महिने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन मिळेनासे झाले. गेल्या ऑगस्टपासून सात महिने अध्यापकांना वेतन न मिळाल्यामुळे लोणावळा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील अध्यापकांनी काम बंद आंदोलन पुकारले होते तर वडगावसह अन्य अभियांत्रिकी महाविद्यालये आणि रुग्णालयातही आंदोलन करण्यात आले होते. एकीकडे शिक्षकांना वेळेवर वेतन दिले जात नसताना लोणावळा येथील संस्थेच्या जागेत ‘गोल्फ क्लब’चे काम मात्र जोरात सुरू होते. याबाबत ‘लोकसत्ता’ने यापूर्वी संस्थेचे प्रमुख मारुती नवले यांच्याकडे विचारणा केली असता शासनाकडून फी शुल्क प्रतिपूर्तीचे कोटय़वधी रुपये येणे बाकी असल्यामुळे शिक्षकांना वेळेवर पगार करता येत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. ‘लोकसत्ता’ने शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न लावून धरल्यानंतर डिसेंबरपासून अध्यापकांना एकूण वेतनाच्या ४० टक्के एवढेच वेतन देण्यात येत असून महागाई भत्ता व घरभाडे भत्त्याची ६० टक्के रक्कम देण्यात आलेली नसल्याचे येथील शिक्षकांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. या अध्यापकांपैकी वेतनासाठी लढा देणाऱ्या प्राध्यापक सचिन शिंदे यांच्यासह काही जणांना सेवेतून काढण्यात आल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.

दरम्यानच्या काळात सिंहगड संस्थेने ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ पुणे शाखेकडून घेतलेले कर्जही परत न केल्यामुळे बँकेने कर्जासाठी जामीनदार असलेले संस्थेचे प्रमुख मारुती नवले आणि सुनंदा नवले यांच्या नावे बँकेचे ३८ कोटी ४१ लाख रुपये अधिक व्याज भरण्यासाठी एक जानेवारी २०१६ ला नोटीस बजावली होती. नोटीस बजाविल्यापासून साठ दिवसांत सदर रक्कम परत न केल्यामुळे बँकेने २९ मार्च रोजी २०१६ रोजी सिंहगड संस्थेच्या बद्रुक कुसगाव, मावळ तालुका पुणे येथील गट क्रमांक ३०९, ३१०,३११, ३२१ अशा चार ठिकाणच्या मालमत्तांचा ताबा घेतला असून या जागांची खरेदी- विक्रीसह कोणताही व्यवहार करू नये अशी जाहीर नोटीसच ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने वृत्तपत्रांमधून दिली आहे. याबाबत संस्थेचे प्रमुख मारुती नवले यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून तसेच एसएमएसद्वारे अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही

First Published on June 22, 2016 3:15 am

Web Title: sinhgad technical education defaulter of bank of maharashtra bank for 38 crore