वाहतुकीच्या दृष्टीने मोक्याचा शीव उड्डाणपूल डागडुजीसाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून तीन महिन्यांसाठी बंद राहणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा निर्णय घेतला असला तरी पर्यायी मार्गिकांचा आणि डागडुजीच्या एकूण नियोजनाचा अहवाल महामंडळाने अजूनही वाहतूक नियंत्रण विभागाला पाठवला नसल्याचे समोर आले आहे.

शहरातून पूर्व उपनगराच्या दिशेने जाण्यासाठी हा उड्डाणपूल महत्त्वपूर्ण दुवा आहे. २००० मध्ये बांधलेल्या या पुलाची आता १८ वर्षांनी दुरुस्ती होत  आहे. या कालावधीत पुलाला खाबांशी धरून ठेवणारी १६० बेअरिंग नादुरुस्त झाल्याने त्या बदलाव्या लागणार आहेत. शिवाय तब्बल ७५० मीटर लांबीच्या या पुलाच्या ११ मीटर अंतरातील २२ सांधेही बदलावे लागणार आहेत. मात्र या दरम्यान पर्यायी मार्गच नसल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे.

दरम्यान, ही दुरुस्ती नेमकी कशी होणार आहे, या संदर्भातील माहिती अजूनही महामंडळाने वाहतूक विभागाला दिलेली नाही. पुलाच्या दुरुस्तीबाबत निर्णय झाल्यावरच त्यासंबंधीची माहिती वाहतूक विभागाला देणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने वाहतुकीचे नियोजन कसे करावे, याबाबत कोणताही निर्णय वाहतूक विभागाला घेता आलेला नाही.

मात्र, डागडुजीच्या नियोजनाबाबतीचा विस्तृत अहवाल तयार करण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले असून येत्या काही दिवसांमध्ये अहवाल वाहतूक विभागाला पाठविला जाईल, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.