सर जे जे कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना चिंता

मुंबई : कला शिक्षणात नावाजलेल्या सर जे. जे. कला महाविद्यालयात अनेक विषयांकरिता शिक्षकच नसल्याने महाविद्यालय सुरू होऊन तीन आठवडे उलटले तरी विद्यार्थ्यांचे वर्गच सुरू झालेले नाहीत.

महाविद्यालयात अंतर्गत रचनाकार (इंटेरीअर डेकोरेशन) अभ्यासक्रमासाठी एकही शिक्षक नाही. सिरॅमिक विषयाच्या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात एकही शिक्षक नाही. सिरॅमिक विभागात टेक्निशियनपदावर कार्यरत असणारी व्यक्तीच विद्यार्थ्यांना विद्यादान देण्याचे काम करत आहे. त्यामुळे महाविद्यालय कागदोपत्री ४ जूनला उघडूनही तासिका सुरू झाल्या नाहीत. शिक्षकांविनाच शिकावे लागत असल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका यांचे एकूण १६ अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमांसाठी शिक्षकांची एकूण ४५ पदे आहेत. मात्र त्यातील १९ रिक्त आहेत. प्राध्यापकांची आठ पदे असताना महाविद्यालयात एकच प्राध्यापक कार्यरत आहे. तर अधिव्याख्यातांची ३६ पदे असून त्यातील ९ पदे नियमित तत्त्वावर भरण्यात आली असून १५ हंगामी आणि कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. महाविद्यालयात इंटेरिअर डिझाईन, टेक्सटाईल आणि सिरॅमिक या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षकांची सर्वाधिक पदे रिक्त आहेत. आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्टसाठी असलेल्या १५ पदांपैकी १० रिक्त आहेत. काही अभ्यासक्रमांसाठी तर एकही प्राध्यापक उपलब्ध नसल्याने यावर्षी हे अभ्यासक्रम कसे चालणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

तासिका तत्त्वावर येणारे प्राध्यापक त्यांच्या तासिका संपल्यानंतर महाविद्यालयात थांबत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शंकाकुशंकांना उत्तर देण्यासाठी कोणीच उपलब्ध होत नसल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत. शिक्षकांबरोबरच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही सुमारे ५० टक्के पदेही रिक्त आहेत. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक मागील काही दिवसांत निवृत्त झाले आहेत. त्यांची पदे भरण्याबाबत महाविद्यालयाकडून कला संचालनालयाला वेळोवेळी कल्पना देण्यात आली. मात्र पदे भरण्याची प्रक्रिया सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील पदे भरण्याकरिता वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.

पाच प्राध्यापकांची निवड

राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांद्वारे महाविद्यालयात प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. मात्र ही भरती प्रक्रिया होत नाही तोपर्यंत प्राध्यापकांची तात्पुरती नियुक्ती करण्यात येत आहे. महाविद्यालयासाठी पाच प्राध्यापकांची निवड करण्यात आली असून ते येत्या तीन दिवसात कामावर रुजू होतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची आम्ही खबरदारी घेत आहोत.