रक्तदाते, रुग्णांच्या नशिबी फाटक्या चादरी, तुटक्या खाटा

संदीप आचार्य, मुंबई</strong>

शासनाच्या जे.जे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांना वर्षांकाठी १७ हजारांहून अधिक रक्ताच्या पिशव्यांचा पुरवठा करणाऱ्या जे.जे. महानगर रक्तपेढीची एका दशकात पुरती वाताहत झाली आहे.

येथे रक्तदानासाठी येणाऱ्या दात्यांना तसेच रुग्णांना तुटक्या खाटा व फाटक्या चादरींचा सामना करावा लागतो. गंभीर बाब म्हणजे रक्ताच्या विविध चाचण्या करणारी बहुतेक उपकरणे बंद पडल्यामुळे रक्तपेढीचा कारभार चालवायचा कसा, असा प्रश्न येथील डॉक्टरांपुढे निर्माण झाला आहे.

दशकापूर्वी आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या ‘राज्य रक्तसंक्रमण परिषदे’च्या माध्यमातून जे.जे. रुग्णालयात महानगर रक्तपेढीची स्थापना करण्यात आली.  मुंबईला आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा करण्याची क्षमता निर्माण करण्याची भूमिका या रक्तपेढी स्थापनेमागे होते. त्यानुसार दिवसाला किमान ४० रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करणारी यंत्रणा निर्माण करण्यात आली.

जे. जे. रुग्णालय व ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत एक रक्तपेढी असून या रक्तपेढीत वार्षिक सहा हजार रक्ताच्या पिशव्या जमा केल्या जातात. त्याचवेळी महानगर रक्तपेढीच्या माध्यमातून वर्षांकाठी जवळपास ३२ हजार रक्ताच्या पिशव्या जमा होतात. जे.जे. रुग्णालयाची रक्तपेढी रुग्णालयातील रुग्णांच्या रक्ताची गरज भागवू शकत नसल्यामुळे येथील रुग्णांसाठी महानगर रक्तपेढीत जमा होणाऱ्या रक्तापैकी जवळपास साठ टक्के रक्त म्हणजे १७ हजार रक्ताच्या पिशव्या वापरल्या जातात, असे येथील डॉक्टरांनी सांगितले. असे असताना या रक्तपेढीचे सक्षमीकरण करण्याऐवजी ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’कडून त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. या रक्तपेढीत डॉक्टर, तंत्रज्ञ, परिचारिका आदी चाळीस पदांची निर्मिती करण्यात आली असून यातील बहुतेक पदे ही कंत्राटी तत्त्वावरील आहेत. या   कर्मचाऱ्यांना आज १० वर्षांनंतरही मानधनात वाढ करण्यात आलेली नाही. महानगर रक्तपेढीतील डॉक्टर, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांच्या संघटनेने येथील १६ खाटांपैकी तुटलेल्या १० खाटांची तात्काळ दुरुस्ती करण्याची तसेच नवीन चादरी देण्याबरोबर बंद पडलेल्या उपकरणांच्या जागी नवीन उपकरणे घेण्याची मागणी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांच्याकडे केली आहे.

विलीनीकरणाची मागणी

जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंदनवाल यांनी जे.जे.मध्ये एकच रक्तपेढी असावी व महानगर रक्तपेढी जे.जे.रुग्णालय व ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात विलीन करावी अशी भूमिका घेतल्यामुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

जे. जे. रुग्णालयातील महानगर रक्तपेढीच्या विलीनीकरणाचा प्रश्नच येत नाही. महानगर रक्तपेढीचे प्रश्न सोडविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील.

– डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव आरोग्य विभाग.