अमर सदाशिव शैला

देशात गेल्या पंचवीस वर्षापासून महिलांना त्यांच्या पायावर उभ्या करणाऱ्या बचतगटांच्या चळवळीला गेल्या वर्षभरात अत्यंत अवघड स्थितीला सामोरे जावे लागत आहे. करोनामुळे अनेक बचतगटांचे काम बंद आहे.

त्यामुळे त्यांनी व्यवसाय उभारणीसाठी घेतलेल्या कर्जांचे हप्ते थकले आहेत. कोणतीही मदत मिळाली नसल्याने त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे.

महिला बचत गटांच्या जाळ्यामार्फत राज्यभरातील गृहिणींना रोजगाराची संधी मिळाली. देशात १९९० नंतर रुजलेल्या या चळवळीने गाव आणि शहरगावांतील हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. ग्रामीण भागांतील अर्थकारणात बचतगटांचे महत्वाचे स्थान आहे.

काय झाले?

अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविणे, हॉटेल्सना पोळ्या, भाकरी पुरवणे, खानावळी सुरू करणे,  पापड, लोणची तयार करणे यांपासून शिलाईकाम, हस्तकला, खाद्यान्नप्रक्रिया उद्योग यांमाध्यमातून महिलांनी स्वयंरोजगार निर्माण केला. मात्र गेल्यावर्षी टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर इतर क्षेत्रांवर झालेल्या परिणामाचे पडसाद बचतगटांच्या कामावरही उमटले. गेल्या वर्षभरापासून अनेक बचतगटांकडे कामे नसल्याने या महिलांची परिस्थिती बिकट झाली आहे. यापूर्वी बचतगटांनी घेतलेले कर्ज फेडणेही या महिलांना जिकरीचे झाले आहे.

भांडवलकर्जे थकली….

‘आमच्या बचत गटात १२ महिला होत्या. त्यातील काहीजणी आता गावी निघून गेल्या आहेत. तर आम्ही   कामाच्या शोधात आहोत. करोनाची रुग्ण संख्या वाढू लागल्याने सोसायटीत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे घरकामही कुठे मिळेनासे झाले आहे. ,‘ असे वाशी नाका परिसरातील एकता महिला बचत गटाच्या जयश्री मैराळे यांनी सांगितले. तर ‘गेल्या २० वर्षांपासून बचत गट चालवत आहे. बचत गटात आम्ही १० महिला आहोत. आतापर्यंत ४ वेळा कर्ज घेतले आहे. तीनदा सर्व कर्ज वेळेत फेडले. मात्र गेल्यावर्षी काम बंद झाल्यापासून कर्ज फेडता आले नाही. आता व्याज वाढू लागले आहे. हे कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न पडला आहे. तर घरातील लोकांची कामेही गेली आहेत. त्यामुळे आहार पुरवठा करण्याचे काम सुरू करावे, ही मागणी घेऊन मुंबईत आलो होतो. त्यावेळी फक्त आश्वासन मिळाले,‘ अशी व्यथा भंडारा येथील चेतना महिला बचत गटाच्या नेहा भंडारी यांनी मांडली.

कोरडे धान्य वाटपाचे काम द्या

अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविणाऱ्या बचत गटांकडे गेल्यावर्षभरापासून काम नाही.  त्यामुळे सरकारने अंगणवाड्यांना ताजा आहार पुरविणाऱ्या बचत गटांना आर्थिक मदत द्यावी. ताज्या आहाराचे काम सुरू होईपर्यंत कोरडे धान्य वाटपाचे काम केंद्रीत पद्धतीने एकाच बड्या संस्थेला न देता, विकेंद्रीत पद्धतीने स्थानिक बचत गटांना द्यावे, अशी मागणी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या (सीटू) राज्य कौन्सिल सदस्य संगीता कांबळे यांनी केली आहे.