रेल्वे मंडळाकडून काम सुरू, वातानुकूलितचा प्रवास न परवडणाऱ्यांसाठी पर्याय

वातानुकूलित गाडीमुळे साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द कराव्या लागत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वेने बारापैकी सहा डबे वातानुकूलित करण्याचा पर्याय विचारात घेतला आहे. रेल्वे मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून तांत्रिक चाचपणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वेमार्गावर चर्चगेट ते बोरिवली आणि विरारदरम्यान एक वातानुकूलित लोकल गाडी धावत आहे. उपनगरी रेल्वेचे वेळापत्रक पाहता ही लोकल चालवण्यासाठी साध्या लोकलच्या बारा फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. नेहमीच्या गाडय़ांच्या फेऱ्या रद्द झाल्याने इतर गाडय़ांवरील प्रवाशांचा भार अधिकच वाढला. भविष्यात वातानुकूलित गाडय़ांची संख्या वाढवण्याच्या विचारात असलेल्या रेल्वेने या परिस्थितीचा विचार केला असून त्यावर विविध पर्याय सुचवण्यात आले आहेत. सामान्य लोकल गाडीच्या प्रथम श्रेणीच्या तिकीट किंवा पास दरांपेक्षा फार जास्त भाडे न आकारण्याचा नवीन प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविलेला आहे. प्रस्ताव अमलात आल्यास वातानुकूलित लोकल गाडीला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा रेल्वे प्रशासनाला आहे.

जादा तिकीट दराचा तिढा असतानाच येत्या काही वर्षांत २१० वातानुकूलित लोकल गाडय़ा मुंबई उपनगरीय रेल्वेवर चालविण्याचाही प्रस्ताव आहे. या लोकल गाडय़ा आल्यास त्याचे भाडे प्रवाशांना परवडणारे असावे आणि यामध्ये प्रथम तसेच द्वितीय श्रेणी, अशी विभागणी करण्याचा विचारही केला जात आहे.

तरीही उपनगरीय प्रवाशांना प्रवास परवडणारा होईल की नाही, अशी शंका असलेल्या रेल्वेने आणखी एक पर्याय समोर ठेवला आहे. सध्या सर्वच मार्गावर बहुतांश बारा डबा लोकल गाडय़ा धावत आहेत. या लोकल गाडय़ांचे सहा डबे वातानुकूलित करता येतात का किंवा त्यांना सहा वातानुकूलित डबे जोडता येतील का याची चाचपणी केली जात आहे. त्यामुळे पूर्णपणे सामान्य लोकल फेऱ्या जरी रद्द केल्या, तरी त्याचा फटका प्रवाशांना बसणार नाही. रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहाणी शुक्रवारी मुंबईत आले असताना पश्चिम, मध्य आणि एमआरव्हीसीसोबत झालेल्या बैठकीतही यावर चर्चा करण्यात आली. या पर्यायावर रेल्वे बोर्डाकडून कामदेखील सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले. पर्यायांचा अभ्यास करूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या सामान्य बारा डबा लोकल गाडीला महिला आणि पुरुषांचे स्वतंत्र डबे असतानाच मालडबा, दिव्यांगांचेही डबे आहेत. त्यामुळे बारा डब्यांपैकी नेमके किती आणि कोणते डबे वातानुकूलित असावेत यावर चर्चा करण्यात आली.

रेल्वेकडून तपासणी

सध्या पश्चिम रेल्वेवर धावत असलेली वातानुकूलित लोकल गाडी रेट्रोफिटेड आहे. सामान्य लोकल गाडीचे वातानुकूलित लोकलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे बारा डबा लोकल गाडीचे सहा डबे वातानुकूलित होऊ शकतात का किंवा त्यांना वातानुकूलित डबे जोडता येऊ शकतात का याचा विचार केला जात आहे.