पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार दरम्यान नियोजित असलेल्या उन्नत (इलेव्हेटेड) रेल्वेमार्ग प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून पायाभूत सुविधा क्षेत्रातील सहा नामवंत कंपन्यांनी या प्रकल्पाच्या बांधणीत रस घेतला आहे. ८ मार्चपर्यंत या कंपन्या प्रकल्पासाठी पात्रतेबाबतचा विनंती प्रस्ताव (रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन) दाखल करतील.
चर्चगेट ते विरार दरम्यान ६३ किलोमीटर लांबीचा उन्नत रेल्वे मार्ग बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रेल्वे मंत्रालयाने हाती घेतला आहे. यात ४३ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग, ८ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तर १२ किलोमीटर लांबीचा मार्ग जमिनीवरून असेल. या उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्पात २६ स्थानके असतील. काम सुरू झाल्यापासून पाच वर्षांत तो बांधून पूर्ण होईल, असा अंदाज आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर उभारण्यात येणारा हा देशातील आजघडीचा सर्वात मोठा प्रकल्प असून त्यासाठी २१ हजार कोटी रुपयांचा खर्च येईल, असा अंदाज आहे. या मार्गावर फक्त वातानुकूलित उपनगरी रेल्वे चालवण्यात येणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्रालयाने त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून देशातील नामांकित सहा कंपन्यांनी प्रकल्प उभारणीत रस दाखवत त्याबाबतच्या बैठकीत सहभाग घेतला. यात एल अँड टी, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, जीएमआर, गॅमन, आयएल अँड एफएस, काफ (स्पेन) यांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे काम २०१४-१५ मध्ये सुरू होऊन २०१९-२० मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. २०१९-२० मध्ये हा उन्नत रेल्वे प्रकल्प सुरू होईल तेव्हा रोज १७ लाख प्रवासी त्याचा लाभ घेतील असा रेल्वेचा अंदाज आहे.