News Flash

घाटकोपर ते कांजूरमार्ग.. प्रवास धोक्याचा

लोकलवर दगडफेकीच्या घटना मोठय़ा प्रमाणात होत असून गेल्या सहा महिन्यांत एकूण १० घटनांत ११ प्रवासी जखमी झाले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

सहा महिन्यांत लोकलवर दगडफेकीच्या सहा घटना; मध्य रेल्वे मार्गावर दहा घटनांत ११ प्रवासी जखमी

लोकलवर दगडफेकीच्या घटना मोठय़ा प्रमाणात होत असून गेल्या सहा महिन्यांत एकूण १० घटनांत ११ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातही घाटकोपर ते कांजूरमार्ग दरम्यानचा लोकल प्रवास धोक्याचा झाला आहे. या प्रवासादरम्यान लोकलवर दगडफेकीच्या सहा घटनांची नोंद झाल्याची माहिती मध्य रेल्वे सुरक्षा दलाने दिली. त्यामुळे मध्य रेल्वेकडून रेल्वे रुळांजवळील झोपडपट्टयांमधून शोधमोहीमही हाती घेण्यात आली आहे.

लोकलच्या दरवाजात किंवा त्या जवळ उभे राहून मोठय़ा संख्येने प्रवासी प्रवास करतात. समाजकंटकांकडून होणाऱ्या दगडफेकीत अनेकदा हे प्रवासी जखमी होतात. गेल्या सहा महिन्यांत मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर सातत्याने या घटना घडत आहेत. नुकतीच मुंब्रा ते दिवा दरम्यान दारूच्या बाटल्या लोकलमधील महिला डब्यावर फेकण्यात आल्याने दोन महिला प्रवासी जखमी झाल्या. यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने शोधमोहीमही हाती घेतली आहे.

सहा महिन्यात मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर १० घटना घडल्या आहेत. यामध्ये ११ प्रवासी जखमी झाले. घाटकोपर ते कांजूरमार्ग दरम्यानच लोकलवर दगडफेकीच्या सहा घटनांची रेल्वे सुरक्षा दलाकडे नोंद झाली आहे, तर टिटवाळाजवळ दोन, मानखुर्द ते गोवंडी दरम्यान एक आणि ठाणे ते कळवा दरम्यान एक घटना घडली आहे.

‘धरपकड सुरू’

रेल्वे रुळांजवळील झोपडपट्टी परिसरातून दगडफेकीचा प्रकार घडतो. तसेच रुळांजवळ असणाऱ्या संरक्षक भिंतींना भगदाड पाडून तसेच संरक्षक जाळ्या तोडून शॉर्टकट मार्ग म्हणून वापरला जातो. त्यातून समाजकंटक रेल्वे हद्दीत प्रवेश करतात. अनेकदा रूळांलगत दारूच्या पाटर्य़ा झोडल्या जातात. नशेबाजी होते. त्यांच्याकडूनही दगडफेकीच्या घटना घडतात. अशांची धरपकड केली जात असल्याचे सुरक्षा दलाने सांगितले.

या घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या भागांत घटना घडल्या आहेत त्या ठिकाणी अचानक छापासत्रही सुरू केले जात आहे. सहा महिन्यांत सहा आरोपींना अटक केली आहे. दोन-तीन वर्षांतही दगडफेकीच्या घटनांची व त्यातील आरोपींची माहिती घेतली जात आहे. सर्वाधिक घटना घाटकोपर ते कांजुरमार्ग दरम्यानच्या आहेत.

– के. के. अश्रफ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे सुरक्षा दल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 12:59 am

Web Title: six incidents of throw the stones on locals abn 97
Next Stories
1 ऑनलाइन ‘गुमास्ता’ पुन्हा ऐरणीवर!
2 पश्चिम रेल्वेचा तांत्रिक बिघाडामुळे खोळंबा
3 बलात्कार प्रकरणी आदित्य पांचोलीवर गुन्हा दाखल
Just Now!
X