News Flash

१३० किमी वेगाच्या लोकलला ब्रेक

सध्या पश्चिम रेल्वेवर दाखल होणाऱ्या बंबार्डिअर गाडय़ांचा कमाल वेग ११० किमी एवढा आहे.

एमयूटीपी-१ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सहा लोकल ‘आरडीएसओ’च्या तांत्रिक चाचणीत नापास

उपनगरीय लोकल गाडय़ांचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने अधिक वेगवान लोकल आणण्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे प्रयत्न तोकडे पडले आहेत. एमयूटीपी-१ या योजनेअंतर्गत मुंबईत ताशी १३० किमी वेगाने धावू शकणाऱ्या सीमेन्स कंपनीच्या नऊ डब्यांच्या सहा गाडय़ा दाखल होणार होत्या. एमयूटीपी-१मधील हा प्रकल्प नंतर एमयूटीपी-२मध्ये ढकलण्यात आला. पण या गाडय़ांच्या बोगी (चाके) १३० किमी एवढय़ा वेगाने धावण्यासाठी तांत्रिकदृष्टय़ा सक्षम नसल्याचे आरडीएसओच्या चाचणीत आढळले आहे. त्यामुळे मुंबईकरांचे १३० किमी वेगाचे स्वप्न हवेत विरले आहे.

मुंबईतील रेल्वे वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प या योजनेचा पहिला टप्पा गेल्या दहा वर्षांपूर्वी राबवण्यास सुरुवात झाली. सध्या या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे प्रगतीपथावर असून तिसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांचे भूमीपूजन नुकतेच पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या एमयूटीपी-१ योजनेनुसार नऊ डब्यांच्या सहा गाडय़ा म्हणजेच ५४ डबे १३० किमी वेगाने धावतील, असा प्रकल्प त्यात समाविष्ट करण्यात आला होता. पण या प्रकल्पातील इतर कामांचा उपसा पाहता या १३० किमी वेगाने धावणाऱ्या गाडय़ांच्या प्रकल्पाचा समावेश पुढे एमयूटीपी-२ योजनेत करण्यात आला. त्यानुसार मुंबई रेल्वे विकास महामंडळाने सीमेन्स कंपनीसह १३० किमी वेगाने धावण्यासाठी सक्षम असलेल्या १०८ बोगींचा (चाकांचा आकार) करार केला होता. त्यासाठी ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.

या करारानुसार तयार होणाऱ्या १०८ बोगी (प्रत्येक डब्याला दोन बोगी असतात) म्हणजेच ५४ डबे मुंबईकरांच्या सेवेत येण्याआधी आरडीएसओतर्फे त्यांची चाचणी घेणे बंधनकारक असते.

सीमेन्स कंपनीने तयार केलेल्या एका बोगीची चाचणी त्या प्रमाणे आरडीएसओने घेतली असता काही तांत्रिक बाबींमध्ये या गाडय़ा सक्षम नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे हा १०८ बोगींचा करार रद्द करण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळाने घेतल्याची माहिती एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी दिली.

.. तर वेळेची बचत

सध्या पश्चिम रेल्वेवर दाखल होणाऱ्या बंबार्डिअर गाडय़ांचा कमाल वेग ११० किमी एवढा आहे. तर सीमेन्स कंपनीच्या सध्या सेवेत असलेल्या गाडय़ा १०० किमी वेगापर्यंत धावू शकतात. या ताशी १३० किमी वेगाने धावणाऱ्या गाडय़ा उपनगरीय सेवेत दाखल झाल्या असत्या, तर प्रवासाचा वेळ कमी करणे शक्य झाले असते. तसेच काही सेवाही वाढवता आल्या असत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 3:44 am

Web Title: six local under mutp 1 failed rdso technical test
Next Stories
1 दळण आणि ‘वळण’ : जरा अदबीने बोला..
2 गॅलऱ्यांचा फेरा : कलागुरूचे दृश्यस्मरण..
3 सहज सफर : निसर्गसौंदर्याची उधळण!
Just Now!
X