राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेविकांना व महिला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची प्रसूती रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी सेवाशर्ती नियमावली, १९८१च्या नियम १६मध्ये प्रसूती रजेची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण सेविकांनी प्रसूती रजा घेतल्यास तो कालावधी शिक्षण सेविका कालावधीसाठी ग्राह्य धरला जात नसे. म्हणजे शिक्षण सेविका पदाचा तीन वर्षांचा कालावधी तेवढय़ा प्रमाणात वाढविला जात असे. शिक्षण सेविका पदाचा कालावधी वाढल्यामुळे वेतनश्रेणी लागू होण्यासही विलंब होत असे.
महाराष्ट्रात हा नियम महिलांसाठी जाचक असल्याचे शिक्षक संघटनांकडून वारंवार लक्षात आणून दिले जात होते.  शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.  आता शिक्षण सेविकांना १८० दिवसांची प्रसूती रजा घेता येईल. त्यानुसार राज्यातील सर्व मान्यताप्राप्त खासगी, माध्यमिक, प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षिका व महिला शिक्षिकेतर कर्मचारी यांना १८० दिवसांची प्रसूती रजा मिळेल.