नवी मुंबईतील खारघर येथे असलेले CRPF चे आणखी सहा जवान करोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने ही माहिती दिली आहे. केंद्रीय सुरक्षा बल अर्थात CRPF च्या आणखी सहा जवानांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खारघर येथील १३९ अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असलेल्या १२ जवानांपैकी ५ जणांना याआधीच करोना झाल्याचे समजले होते. आता आणखी सहा जणांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

काल रात्री म्हणजेच २ एप्रिलला उशिरा १४६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालय कळंबोली येथे ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. या सगळ्यांची कोविड-१९ चाचणी घेण्यात आली. त्यापैकी सहा जण पॉझिटिव्ह असल्याचं समजलं आहे.

केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांना तातडीने विलगीकरणात ठेवल्यामुळे संभाव्य धोका केवळ प्रशासनाच्या निर्णयामुळे कमी झाला आहे. एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र दोन विंग तयार करण्यात आले असून त्यांना आवश्यक असणा-या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी या प्रकरणी विशेष लक्ष घातल्यामुळे नवी मुंबई परिसरातील संभाव्य धोका कमी झाला आहे. अन्य जिल्हयात अशाप्रकारे कोणताही पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास संबंधित प्रशासनाने तातडीची दखल घेऊन त्वरित पुढची कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत.