तुंगारेश्वर घटनेप्रकरणी सहा जणांना अटक व जामीन; प्रसिद्ध दुचाकीस्वार झुबिन पटेल याचाही समावेश

मुंबई : वसई पट्टय़ातील तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात भरधाव दुचाकी चालवून धुमाकूळ घालणाऱ्या सहा दुचाकीस्वारांना अटक करण्यात आली असून त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. या सहा जणांमध्ये प्रसिद्ध दुचाकीस्वार झुबिन पटेल याचाही समावेश आहे.

तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात गेल्या रविवारी ९ फेब्रुवारी काही दुचाकीस्वारांनी धुमाकूळ घातल्याची घटना उघडकीस आली होती. तुंगारेश्वर अभयारण्यातील मंदिराच्या वाटेवरील वनविभागाचे फाटक खुलण्यापूर्वीच काही दुचाकीस्वार अभयारण्यात घुसले होते. या प्रकरणी वनविभागाने सहा दुचाकीस्वारांना अटक करून, जामिनावर सोडले आहे.

दुचाकीस्वारांच्या धुमाकुळीचे चित्रीकरण एका पर्यावरणप्रेमीने केल्यामुळे ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच वनविभागाने ११ फेब्रुवारीस एका दुचाकीस्वारास अटक केली होती. त्यानंतर इतर दुचाकीस्वारांचा शोध घेण्यात आला. अटक केलेल्या दुचाकीस्वाराबरोबरच्या अन्य पाचजणांना वनविभागाने १४ फेब्रुवारीला अटक केली. ‘या प्रकरणी सर्व दुचाकीस्वारांनी तपासामध्ये सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून, त्यांना त्याच दिवशी वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आले आहे,’असे वनअधिकारी दिलीप तोंडे यांनी सांगितले.

या सहा दुचाकीस्वारांमध्ये ९० च्या दशकातील प्रसिद्ध दुचाकीस्वार झुबिन पटेल यांचा समावेश आहे. झुबिन यांनी ९० च्या दशकात राष्ट्रीय स्तरावरील अनेक दुचाकी स्पर्धामध्ये विजय मिळवला होता. तसेच त्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. फिरोज खान, सागर रामगडे, अमित कपाणी, योगी छाब्रिया आणि भावे बंगेरा अशी अन्य पाच दुचाकीस्वारांची नावे असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

या संदर्भात झुबिन पटेल यांच्याशी संपर्क साधला असता, रविवारी ९ फेब्रुवारीला तुंगारेश्वरमध्ये गेल्याचे त्यांनी सांगितले. महिन्यातून एखाद्या रविवारी ते नेहमीच येथे त्यांच्या दुचाकीस्वार मित्रांसोबत जात असतात असे ते म्हणाले. मात्र या ठिकाणी मोटरसायकल डर्ट ट्रॅकप्रमाणे दुचाकी चालवली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आणखी एका चमूचा शोध

वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीस्वारांची चौकशी केली असता सहाजणांचा आणखी एक ग्रुप त्यावेळी तेथे असल्याची माहिती मिळाली आहे. त्या दुचाकीस्वारांचा शोध सुरू आहे. अभयारण्यात ताशी २० किमीपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवण्यास मनाईच्या न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आणि अभयारण्यात बेकायदा प्रवेश आदी कलमांखाली मोटरसायकलस्वारांच्या समूहावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अंतर्गत जास्तीत जास्त सहा महिन्याचा तुरुंगवास आणि पाच हजार रुपये दंडाची तरतूद असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुंगारेश्वरमध्ये दर रविवारी दुचाकी स्वार हमखास येत असतात. सातिवली येथील फाटक १० नंतर खुले होते. मोटरसायकलस्वार सात-साडेसातच्या सुमारास अभयारण्यात येतात आणि फाटक उघडण्यापूर्वी बाहेर पडतात, असे समजते.