प्रत्येक पोलीस निरीक्षकाला निवृत्त होण्यापूर्वी किमान एकदा तरी सहाय्यक पोलीस आयुक्त बनायचे स्वप्न असते. यावेळी केवळ सहा लोकांचेच स्वप्न पूर्ण झाले आहे. पण त्यांची शोकांतिका म्हणजे केवळ त्यांना एक दिवसासाठीच सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) बनता आले.
 राज्यातल्या ११५ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळण्याचा प्रस्ताव नोव्हेंबर २०१४ पासून गृहखात्याकडे प्रलंबित होता. दप्तर दिरंगाईमुळे मात्र त्यावर कारवाई झाली नाही. त्यातील एक पोलीस मॅट मध्ये गेल्याने ११ जणांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळाली. पण उर्वरित पोलीस आज ना उद्या एसीपी बनण्याचे स्वप्न बाळगून होते. या दिरंगाईच्या काळात तब्बल २३ पोलीस सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांचे स्वप्न अर्धवट राहिले. अखेर ३० मे रोजी गृहखात्याने केवळ ६ जणांचे सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती मिळाल्याची यादी काढली. खंडेराव विधाते (गोवंडी), देविदास सोनावणे(धुळे), पंढरीनाथ पाटील (नवी मुंबई), संपत कदम (पुणे प्रशिक्षण केंद्र), धर्मराज ओंबासे (नांदेड),रामचंद्र बरकडे (मुंबई) या सहा जणांचे सहाय्यक पोलीस आयुक्त झाल्याचे या सहा अधिकाऱ्यांचे स्वप्न पुर्ण झाले पण फक्त एका दिवसासाठी. त्यातही दुसरा दिवस रविवार असल्याने कुठलेच काम करता आले नाही.
अर्धा दिवस निरोप समारंभाच्या कार्यक्रमात गेला. केवळ एका दिवसासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त बनवून आमची एकप्रकारे चेष्टाच केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. नायक सिनेमात एका दिवसाचा मुख्यमंत्री अनेक कामे करतो. पण प्रत्यक्षात एका दिवसासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त बनलेल्या या अधिकाऱ्यांना काहीच करता आले नाही.
जेव्हा गृहविभागाकडे फाईल गेली तेव्हाच आदेश काढले असते तर किमान सहा महिने सहाय्यक पोलीस आयुक्त बनून काम करता आले असते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
८७ पोलीस अद्याप प्रतिक्षेत
गृहखात्याच्या दिरंगाईमुळे २३ जण बढती मिळण्यापूर्वीच विनापदोन्नती सेवानिवृत्त झाले. भुसावळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश देशमुख यांचे नाव पदोन्नतीच्या यादीत होते. पण त्यापपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. आता गृहविभागाकडे पडून असेलल्या ११५ जणांच्या यादीतील ८७ वरिष्ठ पोलीस निरीक्षक बढती मिळून सहाय्यक पोलीस आयुक्त बनण्याची वाट पाहत आहेत. याबाबत गृहसचिव के .पी.बक्षी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.