सीबीएसईच्या मार्गदर्शक शिक्षकांची फौजच्या फौज उपलब्ध असल्याने नीट आणि जेईई-मेन्सचे गुण स्वीकारण्याचा राज्याचा निर्णय उत्तरेकडील प्रकाशन संस्थांच्या पथ्यावरच पडला आहे.  त्यामुळे मेरठ आणि दिल्ली येथील प्रकाशन संस्थांची भरभराट झाली आहे.
या वर्षी राज्यात १ लाख १४ हजार मुले नीटला बसली आहेत. पुढील वर्षी जेईई-मेन्स आल्यानंतर तर राज्यातील सुमारे साडेचार लाख मुले या दोन परीक्षांना बसतील असा अंदाज आहे. महाराष्ट्रात तर एमबीबीएस, बीडीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिग इतकेच नव्हे तर पशुवैद्यक आदी अभ्यासक्रमांच्या जागाही नीटच्याच माध्यमातून भरल्या जाणार आहेत. त्यावरून सीईटी पुस्तकांच्या बाजारपेठेची उलाढाल किती कोटींची असेल, याचा अंदाज येतो.  मेरठच्या अरिहंतचा भाग्योदयातील वाटा सर्वात मोठा. राज्यातले तब्बल ५० टक्के मार्केट काबीज करू, अशा विश्वास ‘अरिहंत’ला वाटतो. ‘आतापर्यंत केवळ केंद्रीय स्तरावर होणाऱ्या आयआयटी-जेईई, एआयईईई किंवा ‘एआयएमई’ या प्रवेश परीक्षांसाठी तयारी करणारे राज्यातील विद्यार्थीच आमचे ग्राहक होते. भविष्यात या बाजारातील ५० टक्के वाटा आमच्याकडे असेल,’ असा विश्वास ‘अरिहंत’चे पुण्यातील प्रतिनिधी दीपक बरनवाल यांनी व्यक्त केला.
मुंबईतील काही बडय़ा पुस्तक विक्रेत्यांच्या प्रतिक्रियाही याला पुष्टी देणाऱ्या आहेत. आक्रमक जाहिरातबाजीतून राज्याबाहेरील विशेषत: उत्तर भारतातील प्रकाशन संस्थांनी २५ ते ३० टक्के मार्केट आताच काबीज केल्याचे ‘आयडियल’चे अमोल नेरूरकर यांनी सांगितले. भाईंदरमधील ‘लक्ष्मी स्टोर्स’ या शैक्षणिक पुस्तकांच्या दुकानाचे व्यापारी सुरेश व्यास यांनीही याला दुजोरा दिला.
क्लासचालकही हीच पुस्तके संदर्भासाठी वापरण्याचा सल्ला मुलांना देऊ लागले आहेत. ‘विज्ञान परिवारा’चे संचालक आणि एस. पी. क्लासेसचे प्रा. सुभाष जोशी यांच्या मते पाठय़पुस्तकांव्यतिरिक्त या संदर्भ पुस्तकांवर वर्षांला अंदाजे सहा हजार रूपये मुलांना अधिकचे खर्च करावे लागतील. पण, ही पुस्तके पाठांतरासाठी नसून वाचून त्यातील संकल्पना समजून घेण्यासाठी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.  (क्रमश:)