मानखुर्दच्या नवजीवन सुधारगृहातून पुन्हा एकदा महिला पळून जाण्याची घटना घडली आहे. सुधारगृहाच्या स्वच्छतागृहाचे गज कापून बुधवारी रात्री सहा महिलांने पलायन केले. गेल्या दीड वर्षांत या सुधारगृहातून महिलांच्या पळून जाण्याच्या चार घटना घडल्या आहेत.
पळून गेलेल्या सर्व महिला २२ ते ३५ वर्षे वयोगटातील आहेत. मुंबईतील कुंटणखाना आणि बारमधून सुटका केलेल्या या महिलांना येथे ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर या महिला एक एक करून स्वच्छतागृहात गेल्या. महिला सुरक्षा रक्षकांना काही महिलांनी बोलण्यात गुंतवून ठेवले होते. त्याचवेळी स्वच्छतागृहातील खिडकीचे गज काही महिलांनी एक्सो ब्लेडने कापले. तेथून बाहेर आल्यानंतर त्यांनी सुधारगृहाची संरक्षक भिंत ओलांडून पलायन केले. सुरक्षा रक्षकाने त्यांना पळताना पाहिले, पण तो त्यांना अडवू शकला नाही. यावेळी सुधारगृहात एकूण ७८ महिला होत्या. पळून गेलेल्या महिल्या वर्षभरापासून या सुधारगृहात राहात होत्या.   गोवंडी पोलिसांनी याप्रकरणी या सहा महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. या महिलांनी पळून जाण्याची योजना बनवली होती. त्यासाठी त्यांनी तयारीही केली होती, अशी माहिती गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राणे यांनी दिली.

महिला पलायनाच्या घटना
दिनांक                       महिला
१० सप्टेंबर २०१२          १७
२७ ऑक्टोबर २०१२      ३५
३ डिसेंबर २०१२             ९