पोलीस भरतीत धावण्याच्या चाचणीदरम्यान भोवळ येऊन कोसळल्याने सहा महिला उमेदवारांना शनिवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. निर्जलीकरणामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
सध्या राज्यभरात पोलीस भरती सुरू असून मुंबईतील कांजूरमार्ग येथील पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यावर पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांची धावण्याची चाचणी घेण्यात येते. शनिवारी ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत धावताना पाच महिला उमेदवारांना भोवळ येऊन त्या पडल्या. भांडुप ते कांजूरमार्गदरम्यान धावताना रेणुका गायकवाड (२२), प्रतीक्षा वाळवे (२१), मनीषा मुंडे (२२), गीता घोडके (२४), सरिता काळे (२४) या महिलांना तर, गोदरेज ते घाटकोपर पुलादरम्यान धावताना मंदा खंदारे या महिला उमेदवाराला भोवळ आली.