परभणीच्या रखमाबाईंना जन्मतच मोतिबिंदू होता. त्यामुळे चाचपडतच त्यांचे आयुष्य गेले. वयाच्या ६५व्या वर्षी आपण हे जग याचि देहा, याचि डोळा पाहू शकू, असे त्यांच्या गावीही नव्हते. मात्र, परभणीत भरलेल्या नेत्रचिकित्सा शिबिरात एका दृष्टिदात्याची नजर रखमाबाईंच्या अंध डोळ्यांवर खिळली. रखमाबाईंना नवी दृष्टी द्यायची असा निर्धार झाला आणि भायखळ्याच्या जे. जे. रुग्णालयात रखमाबाईंच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. चक्क ६५व्या वर्षी रखमाबाईंना जग पाहायला मिळाले! हे एकच उदाहरण नाही. जे. जे. रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभागात गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून हा दृष्टिदान यज्ञ सुरू असून त्यामुळे असंख्य जिवांना नव्याने जग पाहायला मिळाले आहे.
बारामतीच्या भागाबाईंचीही अवस्था रखमाबाईंसारखीच. ५४ वर्षांच्या भागाबाई ३२ वर्षांपासून दृष्टिहीन होत्या. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्यावरही शस्त्रक्रिया झाली आणि त्यांनाही जग दिसू लागले. आपल्याला हे जग पाहायला मिळाले याचा रखमाबाई आणि भागाबाई यांना एवढा आनंद झाला की, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे शब्दच उरलेले नव्हते. कृतार्थ नजरेनेच त्यांनी जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिनी पारेख यांचे आभार मानले.
डोळ्यातील टय़ुमर (गाठ) काढणे ही अवघड शस्त्रक्रिया असून खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी किमान एक लाख रुपये खर्च येतो. गेल्या वर्षभरात डॉ. लहाने यांनी अशा टय़ुमरच्या १६७ यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. जे. जे. चे अधिष्ठाता बनल्यापासून डॉ. लहाने सकाळी पावणेआठ वाजता नेत्रचिकित्सा विभागात येऊन शस्त्रक्रिया करतात. त्यानंतर अधिष्ठाता म्हणून दिवसभर त्यांचे काम करतात. नेत्रचिकित्सा विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात ७७ हजार रुग्ण वर्षांकाठी तपासले जातात तर शिबिरांमध्ये एक लाखाहून अधिक रुग्णांची तपासणी केली जाते. गेल्या वर्षभरात येथे १५,६५० शस्त्रक्रिया झाल्या. यात मोतिबिंदूपासून काचबिंदूपर्यंत आणि टय़ुमरपासून लहान बाळांच्या डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

सलग तीन वर्षे सर्वाधिक शस्त्रक्रिया
डॉ. रागिनी पारेख यांनी सलग तिसऱ्या वर्षी देशात डोळ्याच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्याचा मान मिळवला आहे. तीन वर्षांपूर्वी साडेचार हजार शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. पारेख यांनी दोन वर्षांपूर्वी ५२०० शस्त्रक्रिया केल्या तर गेल्या वर्षभरात ५६०० शस्त्रक्रियांची त्यांच्या नावावर नोंद आहे.