‘करिअर चांगले होण्यासाठी कौशल्य आवश्यक असते, पदवी नाही. पदवी आणि रोजगाराचा संबंध तोडणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत अनेक संधी उपलब्ध आहेत,’ असे सांगत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘आत्मविश्वास बाळगा, स्वप्न पाहा आणि ती पूर्ण करण्याची जिद्द ठेवा, वेगळ्या वाटा चोखाळा,’ अशी त्रिसूत्री तावडे यांनी विद्यार्थ्यांना दिली.

करिअरच्या वेगळ्या वाटा चोखाळण्यापासून तणावाचे नियोजन, वैद्यकीय, तांत्रिक शाखांतील शिक्षण, स्पर्धापरीक्षांची तयारी अशा विविध विषयांचे मार्गदर्शन घेण्याची संधी ‘लोकसत्ता मार्ग यशा’चा या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाली. दोन दिवसांच्या कार्यशाळेचे उद्घाटन गुरुवारी तावडे यांच्या हस्ते झाले. या वेळी संदीप युनिव्हर्सिटीचे संदीप झा, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्सचे डॉ. जयवंत शेलार, विद्यालंकारचे विश्वास देशपांडे, झील अ‍ॅकॅडमीचे झीशान पठाण उपस्थित होते.

या वेळी तावडे म्हणाले, ‘करिअरची वाट निवडताना पालकांचा सल्ला महत्त्वाचा असतो. मात्र पालकांनीही दुराग्रही असू नये. प्रत्येक व्यक्तीकडे स्वतंत्र कौशल्ये आणि क्षमता असतात. त्यामुळे कुणीच कमी किंवा जास्त नसतो. आपली क्षमता ओळखून त्यानुसार करिअरची वाट चोखाळणे गरजेचे आहे. मुळात पदवी आणि रोजगाराचा संबंध तोडणे गरजेचे आहे. पदवी मिळाली म्हणजे करिअर होते असे नाही. आपल्या पायावर उभे राहण्यासाठी पदवी आवश्यक नाही तर कौशल्य गरजेचे आहे. अनेक क्षेत्रांत कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज असते. मात्र, या संधीचा शोध घेतला पाहिजे. आपली आवड आणि अपेक्षित संधी याचा अदमास घेऊन क्षेत्राची निवड करावी. ’ कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, शेफ देवव्रत जातेगावकर, नाटककार आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर, चित्रकार आणि समीक्षक महेंद्र दामले, अभियांत्रिकी तज्ज्ञ डॉ. जयंत पानसे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरसे, समुपदेशक विवेक वेलणकर, नाशिक जिल्ह्य़ाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी सीईओ) अनिल नागणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध संस्था, अभ्यासक्रम यांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते.

आरक्षण गरजेचे : तावडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनाही मोकळेपणाने उत्तरे दिली. चांगले गुण असतानाही आरक्षणाच्या तरतुदीमुळे हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही, अशी तक्रार एका विद्यार्थिनीने केली. त्या वेळी आरक्षण का आवश्यक आहे, याचे स्पष्टीकरण तावडे यांनी दिले. ते म्हणाले, ‘आपण आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणाऱ्या कुटुंबातील आहोत. सामाजिकदृष्टय़ाही आपण खूप सुरक्षित आहोत. त्यामुळे सामाजिक परिस्थितीची जाणीव आपल्याला फारशी होत नाही. अनेक ठिकाणी सामाजिक घटकांना आजही शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे आरक्षण गरजेचे आहे.’

कार्यशाळेत आज काय?

करिअरचा ताण कसा हाताळावा?’

– मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे; ‘करिअर निवडीच्या टप्प्यावर’ – करिअर समुपदेशक विवेक वेलणकर;  ‘डॉक्टर होताना’

– बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते; ‘अभियांत्रिकी आणि संबंधित करिअर’

– डॉ. जयंत पानसे; ‘वेगळ्या वाटा’

– दिग्दर्शक अभिराम भडकमकर, शेफ देवव्रत जातेगावकर, चित्रकार समीक्षक महेंद्र दामले; ‘केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी’ – प्राप्तिकर उपायुक्त प्रसाद चाफेकर.

कार्यशाळेचे हे सत्र शुक्रवारी सकाळी १० वाजता रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे. गुरुवारी कार्यशाळेस उपस्थित राहू न शकलेल्या विद्यार्थी आणि पालकांना शुक्रवारी या कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रवेशिका कार्यक्रम स्थळीही उपलब्ध होणार आहेत.

याचबरोबर या कार्यक्रमाची तिकिटे खालील संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत https://www.townscript.com/e/loksatta-marga-yashacha-mumbai-234014

प्रायोजक –

  • टायटल पार्टनर – आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्स.
  • असोसिएट पार्टनर – विद्यालंकार क्लासेस, झील अकादमी आणि संदीप युनिव्हर्सिटी.
  • पॉवर्ड बाय पार्टनर – एडय़ुरशिया (ओव्हरसीज अ‍ॅडमिशन्स फॉर मेडिकल, इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड एमबीए), गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, के ११ अ‍ॅकॅडमी ऑफ फिटनेस सायन्स, कैझेन मल्टिमीडिया, संकल्प मेश्रामज् द आर्ट ऑफ सिनेमा कोर्सेस, उत्क्रांती राइज अ‍ॅण्ड राइज, युक्ती इंजिनीअरिंग, मेडिकल अ‍ॅण्ड फाउंडेशन, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट, रॉय ओव्हरसीज पाथवे ग्रुप, अ‍ॅस्टय़ुट ग्रुप.