भांडुप

भांडुपमध्ये गर्दीच्या वेळी पादचाऱ्यांना अडथळा

रेल्वे प्रवाशांना स्थानकातून सुरक्षित बाहेर पडता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शहरातील रेल्वे स्थानके स्कायवॉकनी जोडली.  मात्र भांडुपच्या स्कायवॉकवर मोठय़ा प्रमाणात मोबाइल टॉवरच्या पेटय़ा बसविण्यात आल्या असून त्यामुळे स्कायवॉकवर भार वाढला आहे. स्कायवॉकवरील मोबाइल टॉवरच्या पेटय़ांचा गर्दीच्या वेळी पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

भांडुप रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २, ३ आणि ४ ला जोडण्यात आलेल्या स्कायवॉकवरून पश्चिमेला लालबहादूर शास्त्री मार्गावर जाता येते. भांडुप रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मोठय़ा प्रमाणात बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमी ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. त्यातच बाजूला विविध कंपन्यांची कार्यालये असल्याने या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते. शिवाय रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या रिक्षा स्टँडमुळे स्थानकातून बाहेर पडताना प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची या कोंडीतून सुटका करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने येथे स्कायवॉक उभारला. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या स्थानकावर विविध मोबाइल कंपन्यांचे टॉवर उभारण्यात आल्याने, या टॉवरची यंत्रणा असलेल्या पेटय़ा कंपन्यांनी स्कायवॉकवरच ठेवल्या आहेत. परिणामी गर्दीच्या वेळी स्कायवॉकवरून जाताना या पेटय़ा प्रवाशांना अडथळा ठरत असल्याचे विवेक जाधव या प्रवाशाने सांगितले. त्यामुळे किमान रस्त्यातून या पेटय़ा बाजूला कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भांडुपचा स्कायवॉक पालिकेच्या ताब्यात आहे. मात्र कित्येक वर्षांपासून पालिकेने या स्कायवॉककडे लक्षच दिलेले नाही. परिणामी स्कायवॉकवर अनेक ठिकाणी लाद्या उखडून खड्डे पडले आहेत. तर स्कायवॉकला लावण्यात आलेल्या स्टीलच्या ग्रिल अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. त्यामुळे या स्कायवॉकवर अपघात घडण्याची भीती नूर शेख या प्रवाशाने व्यक्त केली. तर विविध कंपन्या आणि काही संस्थांनी स्टिकर चिकटवून हा स्कायवॉक विद्रूप केला आहे. त्यामुळे स्कायवॉकवर आपली जाहिरातबाजी करण्यासाठी स्टिकर चिकटविणाऱ्यांविरुद्ध पालिकेने कडक कारवाई करावी, अशी मागणी पादचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.