वांद्रय़ाच्या शासकीय वसाहतीतील रहिवाशांचा सवाल; छताचा भाग कोसळून मायलेक जखमी

मुंबई : वांद्रे शासकीय वसाहतीत गुरुवारी पहाटे एका घरातील छताचा (स्लॅब) भाग कोसळून लहान मुलासह दोघे जखमी झाले आणि दर पावसाळ्यात जीव मुठीत धरून जगणाऱ्या इथल्या हजारो कुटुंबांचा संताप अनावर झाला. रहिवाशांनी लगोलग वसाहतीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय घेरले. तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरत आमचे जीव गेल्यावरच जाग येणार का, असा सवाल केला. हा मोक्याचा भूखंड खासगी विकासकाच्या घशात घालणे सोपे जावे यासाठीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वसाहतीतल्या इमारतींची डागडुजी केली जात नाही, असा आरोपही रहिवाशांनी केला.

शासनाच्या परिवहन विभागात नेमणुकीस असलेले हरिश्चंद्र महाले पत्नी आणि मुलासोबत वसाहतीतल्या ब-२९५ इमारतीत राहतात. त्यांच्या पत्नी आजारी आहेत. त्यामुळे आईला पाहण्यासाठी हरिश्चंद्र यांची विवाहित कन्या वैशाली सावंत (३२) आणि नातू नैतिक (९) घरी आले होते. बुधवारी रात्री सर्व जण झोपले असताना दिवाणखान्याच्या छताचा भाग वैशाली आणि नैतिक यांच्यावर कोसळला. महाले कुटुंबाने या दोघांनाही बाहेर काढून भाभा रुग्णालयात दाखल केले. नैतिक हा घटनेत जबर जखमी झाला असून वैशाली यांना मुका मार लागला आहे.

दरम्यान, या अपघाताचे वृत्त समजताच शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱ्यांचा संताप अनावर झाला. गेल्या काही महिन्यांत या वसाहतीत झालेला हा तिसरा अपघात आहे. काही महिन्यांपूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर स्लॅब पडून तो जखमी झाला होता. त्यानंतरही अशीच एक घटना घडल्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील सर्व इमारतींचे सरंचनात्मक परीक्षण सुरू केले. त्याआधारे धोकादायक इमारतीही जाहीर करण्यात आल्या. मात्र, महाले कुटुंब राहात असलेली इमारत ‘सुरक्षित’ म्हणून जाहीर करण्यात आली होती, अशी माहिती स्थानिक रहिवासी मनोज बापर्डेकर यांनी दिली.

वसाहतीतील रहिवाशांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी बांधकाम विभागाने येथे एक कार्यालय सुरू केले. या कार्यालयात असंख्य तक्रारी येतात. त्या नोंदवहीत नोंदवल्या जातात. मात्र पुढे काहीच होत नाही. सरकारकडे पैसा नाही, निधी मिळेल तेव्हाच डागडुजी, प्रतिबंधात्मक उपाय केले जातील, अशी उत्तरे या कार्यालयातून सर्रासपणे रहिवाशांच्या तोंडावर फेकली जातात. गुरुवारच्या घटनेनंतर कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेलेल्या रहिवाशांना रेती, कॉंक्रीट उपलब्ध नाही, असे उत्तर देण्यात आले, अशी माहिती विनोद जोशी यांनी दिली.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रहिवाशांसोबत या कार्यालयाला घेराव घातला. त्यानंतर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि संबंधित अधिकारी वर्गाने इमारतीची पाहाणी करून त्वरेने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

सुमारे चार हजार घरांची वसाहत पन्नास वर्षांपूर्वीची आहे.

येथील प्रत्येक इमारतीत पडझड, गळती, दूषित पाणीपुरवठा या आणि अशा असंख्य तक्रारी आहेत. त्या तक्रारींकडे तत्परतेने कधीच लक्ष दिले जात नाही. प्रत्येक वेळी निधी आणि मनुष्यबळाचे कारण पुढे केले जाते.

त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात येथील रहिवासी जीव मुठीत धरून जगतात. मुसळधार पावसात या सर्वाच्याच काळजाचा ठोका चुकतो.

‘डागडुजी शक्य’

या इमारती ७० वर्षे जुन्या आहेत. संरचनात्मक तपासणीत ज्या अतिधोकादायक आढळल्या त्या पाडण्यात आल्या. गुरुवारी पहाटे अपघात घडला ती इमारत अतिधोकायदायक नाही, मात्र डागडुजीची आवश्यकता आहे. रहिवाशांनी खोल्या खाली केल्या तर डागडुजीचे काम विनाअडथळा वेगाने पूर्ण करणे शक्य होईल. वसाहतीत काही खोल्या रिकाम्या आहेत तेथे या इमारतीतील रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर शक्य आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता  वसईकर यांनी दिली.