सोमवारी पहाटे आलेल्या गुलाबी थंडीनंतर मुंबईतील तापमान पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी व संध्याकाळीही हुडहुडी भरलेल्या मुंबईकरांनी लगबगीने बाहेर काढलेल्या शाली, मफलरींचा सध्या तरी फारसा उपयोग नाही. शहरातील किमान तापमान १९ अंश सेल्सिअसवर असून थंडीचा कडाका लगेचच परतणार नसल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.
देशाच्या उत्तर भागात पश्चिमेकडून थंड वारे येतात आणि त्यामुळे बर्फवृष्टी होते. देशाच्या उत्तर भागातून दक्षिणेकडे येणाऱ्या वाऱ्यांसोबत ही थंडी राज्य तसेच मुंबईत प्रवेश करते. सध्या काश्मीर तसेच उत्तर प्रदेशात बर्फवृष्टी सुरू आहे. मात्र राज्यात येणाऱ्या वाऱ्यांची दिशा उत्तरेऐवजी पूर्वेकडून आहे. त्यामुळे उत्तर भाग थंड असला तरी त्याचा प्रभाव मुंबईत जाणवत नाही.
सध्या ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ उत्तरेत सक्रीय नाही. तसेच राज्यात येणाऱ्या वाऱ्यांची दिशाही पूर्वेकडून आहे. त्यामुळे शहरातील किमान तापमानात घसरण होणार नाही. आणखी चार ते पाच दिवस तापमान चढे राहील, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे संचालक व्ही. के. राजीव यांनी दिली. सोमवारी सकाळी सांताक्रूझ येथे १४.४ अंश से. किमान तापमानाची नोंद झाली. मात्र त्यानंतर मंगळवारी व बुधवारी किमान तापमान अनुक्रमे १५.८ अंश से. व १९.६ अंश से. राहिले. गुरुवारीही किमान तापमान १९ अंशांच्या दरम्यान राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.