हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठाण मांडले. विरोधकांनी यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोके वर पाय’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशा घोषणा देत मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी तसेच दुष्काळी मदत म्हणून सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये देण्याची मागणी विरोधकांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानभवनात प्रवेश करत असताना विरोधकांनी मोठ्या आवाजात घोषणा दिल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते.

दरम्यान, हिवाळी अधिवेशन वादग्रस्त ठरणार याची चाहूल रविवारी विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिसून आली होती. विरोधकांनी ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’ अशी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उपमा दिली होती. तसेच आरक्षण व दुष्काळी मदतीबाबत आक्रमक राहणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.