News Flash

दसरा मेळाव्यात शिवसैनिकांची मोदींविरोधात घोषणाबाजी

या मेळाव्यात शिवसेना आणि भाजपाचे संबंध किती ताणले आहेत हे पुन्हा एकदा दिसून आलं.

(शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला जमलेले शिवसैनिक, फोटो- प्रशांत नाडकर)

शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारचा जोरदार समाचार घेतला. जनतेला दिलेली आश्वासनं, वाढती महागाई, राज्यातील दुष्काळी परिस्थिती या सर्व मुद्द्यांवर त्यांनी केंद्र आणि राज्यातल्या सरकारला घेरलं. दरम्यान, राज्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर झाला नाही तर शिवसेना स्वतःच्याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसंच एकतर राम मंदिर बांधा नाहीतर जाहीर करा की राम मंदिरचाही जुमला होता. तुमच्याकडून जर राम मंदिर बांधायला सुरुवात झाली नाही तर आम्ही ते बांधू, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघाती हल्लाबोल केला.

दरम्यान, या मेळाव्यात शिवसेना आणि भाजपाचे संबंध किती ताणले आहेत हे पुन्हा एकदा दिसून आलं. शिवाजी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारविरोधात घोषणा दिल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेत्यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. या भाषणांतून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधण्यात आला.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या आधी संजय राऊत आणि रामदास कदम यांनी नरेंद्र मोदी सरकारवर कडाडून टीका केली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिला तर राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा घणाघात केला. शिवसेना नेते व राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राफेलवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2018 9:53 pm

Web Title: slogans raised against pm modi and bjp in shiv sena dasara melava
Next Stories
1 …तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे
2 स्वारगेट पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू ?
3 घटोत्थापनाने तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता
Just Now!
X