रहिवाशांकडून प्रतिसाद नसल्याने पालिका चिंतेत; झोपडपट्टय़ांत संसर्ग वेगाने पसरण्याची भीती

मुंबई : दिवसाला एक हजार लोकांचे लसीकरण क्षमता असलेल्या धारावी लसीकरण केंद्रावर धारावीकरांकडून तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. दाट लोकवस्ती असलेल्या धारावीत करोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने पसरू लागला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होणे गरजेचे असल्याने पालिकेने धारावीत लसीकरण मोहीम हाती घेतली आहे, परंतु या मोहिमेकडेही धारावीकरांनी पाठ फिरवली आहे.

वांद्रे-कु र्ला संकु ल आणि शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात जाऊन करोनाची लस घेण्यास धारावीकरांकडून दुर्लक्ष होत असल्याने पालिकेने या परिसरात स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू केले. मात्र, धारावीकर लसीकरणाबाबत फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. ४५ वर्षांंवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केल्यानंतर प्रतिसाद वाढेल असा पालिके ला अंदाज होता.  परंतु रहिवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे घरोघरी जाऊन नागरिकांना लसीकरणासाठी विनंती करण्याची वेळ पालिकेवर आली आहे.

धारावीकरांचे लसीकरण व्हावे, जनजागृती व्हावी यासाठी पालिकेची ‘लसीकरण मोहीम’ सुरू आहे. यासाठी घरोघरी जाऊन रहिवाशांना आवाहन केले जात आहे, ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. लसीकरण केंद्रापर्यंत येण्यासाठी बस सेवा, ध्वनिक्षेपकाच्या साहाय्याने आवाहन करण्यात येत आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसात केवळ तीन हजार नागरिकांनी धारावीतील केंद्रात लस घेतली.

लसीकरण केंद्र रविवारी सुरू असूनही ४ एप्रिल रोजी फक्त १७० लोकांनी लसीकरण केले. त्याआधी शनिवारी सर्वाधिक म्हणजे ४४१ नागरिकांनी लस घेतली. सोमवारी ३९० लोकांचे लसीकरण झाले. धारावीतील नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे यासाठी पालिका प्रयत्न करात असून नागरिकांच्या सहकार्याची गरज असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्थानिक पातळीवर प्रयत्न

लसीकरण मोहिमेसोबतच दुसरा पर्याय म्हणून जी- उत्तर चे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी नुकतीच धारावीतील स्थानिक डॉक्टरांची बैठक घेतली. लोकांना लसीकरणासाठी जागृत करण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले. तसेच खासदार राहुल शेवाळे यांनी सोमवारी बैठक घेऊन धारावीतील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांंना लसीकरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना केल्या आहेत.

अडतेय कुठे?

धारावीत मजूर, कामगार यांची संख्या अधिक आहे. शिवाय निरक्षरतेचे प्रमाण जास्त असल्याने लसीकरणाबाबत लोकांच्या मनात भीती आहे. लस घेतली तर आपल्याला काही तरी अपाय होईल अशी अफवा येथे पसरली आहे. त्यामुळे पालिके कडून विनंती करूनही लोक लसीकरणाबाबत विचार करत नाहीत.

धारावीत १ एप्रिलपासून लसीकरण केंद्रावर गर्दी होईल असे वाटले होते, परंतु तसे झाले नाही. उच्चभ्रू आणि शिक्षित वर्गाकडून लसीकारणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु झोपडपट्टीसारख्या भागांमध्ये लोकांना लसीकरणाचे महत्त्व समजलेले नाही. धारावीत पालिकेचे कर्मचारी दारोदारी जाऊन लोकांना समजावत आहेत, त्यामुळे येत्या काळात हे चित्र बदलेल आणि लोक मोठय़ा प्रमाणात लसीकरणाला येतील अशी आशा आहे.

किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, जी- उत्तर विभाग