मोबाइल फोनची बॅटरी कणाकणाने उतरत चालली आहे. तो मरू नये म्हणून मग ‘मोबाइल डेटा’ बंद कर, काही काळ फोनच बंद करून ठेव असे चाललेले. एकदा व्हाट्सअ‍ॅप बंद केल्यानंतर मग बाहेर काय चाललेय हे कळायला मार्गच नाही. बाहेर तर पाऊस धो धो कोसळतोय. पाणी वाढत चाललेय. पाणी. अत्यंत घाणेरडे, काळेशार, कचरायुक्त पाणी. त्यात पाऊल ठेवायचे म्हटले तरी अंगावर शिरशिरी यावी. दुपारपासून ते वाढतच चालले होते. पण त्यातही लोकल मध्येच पुढे जायची. गचका खात थांबायची. मध्येच थंड पडायची आणि काही वेळाने तिची धडधड सुरू व्हायची. त्यामुळे मनात आशा, की जाईल बिचारी पुढच्या चुनाभट्टी स्टेशनवर कशीबशी. मग उतरू. वेळ पुढे सरकत होता. सगळे अस्वस्थ. उतरावे का खाली? करायचे का धाडस?.. नको. आता थांबेल हा पाऊस. उतरेल पाणी.. अशी काय काय चर्चा सुरू.. कोणी पेंगत होते. कोणी उगाचच दारात जाऊन बाहेर भक्कपणे पाहात उभे राहात होते. ती सायंदुपार संपून आता संध्याकाळ झाली होती. त्या काळोख्या उजेडात बाहेरचे पाणी अधिकच काळेशार दिसत होते. आता ते आणखी वर चढले होते. समजा डब्यातही शिरले तर?

अचानक डब्यात आरडाओरडा सुरू झाला.. चला, चला, उतरा खाली.. म्हणत काही तरुण पोरे शिरली डब्यात. ही बहुधा बाजूच्या झोपडपट्टीतली असावीत. पाणी चढत चाललेय. रात्र होईल. मग तुम्हाला वाचवायला कोणीच नसेल इथे. आताच उतरून घ्या. तुम्हाला आम्ही मदत करतो.. असे म्हणत त्यांनी उतरवले सगळ्यांना. नीट आधार देत. हाताला धरत. रांग लावली रेल्वेच्या रुळांतून. कमरेएवढे पाणी. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत, एकेका पावलाने ती रांग डचमळत पुढे सरकत होती. किती वेळ चालणार असे?.. सगळाच अंधार होता. आणि पुढे जाऊन काय करायचे? ती मुले धीर देत होती. मदत करीत होती.

पहिल्या वर्गाच्या डब्यात एकच गृहस्थ होते. बाकीचे बहुधा आधीच उतरून गेले असावेत. हे म्हातारेसे गृहस्थ. अपंग थोडेसे. मी नाही उतरत म्हणत होते. पोरांनी बळेच उतरवले त्यांना. तसे ते ओरडू लागले. ये अरे धरा रे मला. मला चालता येत नाही. मग दोन पोरे सरसावली. हातांच्या झोळीत त्या बाबांना बसवले आणि त्यांना घेऊन चालू लागली..

बऱ्याच वेळाने चुनाभट्टी आली. एरवी कितीवेळा या स्थानकावरून गेलोय. कधी ढुंकूनही पाहावेसे वाटले नव्हते तिकडे. पण त्याक्षणी ते म्हणजे स्वर्गादपि गरियसी वगैरे वाटले.

या ओल्याचिंब अवस्थेत कचेरीस वगैरे जाणे अशक्यच. आता वाट धरायची ती घरपरतीची.

एकदा पूर्व द्रुतगती महामार्गावर आलो की मग काय, बस, टॅक्सी वगैरे मिळेलच. मन फारच आशावादी होते अशा काळात. तंगडेतोड करीत त्या महामार्गावर आलो नि सगळ्या आशांचा पुन्हा लगदा झाला. रस्त्यावर वाहनांची आणि वाहनांत माणसांची.. ही तुडुंब गर्दी. आशाळभूतपणे प्रत्येक वाहनाला हात दाखवत, ठाना? न्यू मुंबई? घाटकोपर? असे प्रश्न विचारणारे पादचारी. भिजलेले, थकलेले, घरच्या ओढीने अस्वस्थ झालेले.. वाहन मिळत नाही, म्हटल्यावर तसेच पुढे पुढे चालत राहणारे लोक. असे चालत जाऊन जणू घर अधिक जवळ आणू पाहणारे.. हवालदिल लोक. कुठून कुठून चालत आलेले..

महामार्गावर ‘प्रियदर्शनी’च्या तिठय़ावर ही कोंडी. मुंगीचा वेगही अधिक असेल अशी चाललेली वाहने. तिथे पुन्हा ही तरुणाई चिंब भिजत उभी होती. येणारे टेम्पो, ट्रक, कंपन्यांच्या गाडय़ा सरळ आडवे पडून अडवत होती. अडकलेल्या माणसांना त्यात चढवून मार्गस्थ करीत होती.. कोणी सांगितली होती त्यांना ही उठाठेव? काय मिळणार होते त्यातून त्यांना? त्यातील कोणाच्या खांद्यावर ना कोणाचा झेंडा होता, ना अंगावर कोण्या नेत्याची टीशर्टे. डोळ्यांत मात्र त्यांच्या एक भाव दिसत होता. माणुसकीचा. माणसाने माणसाला माणसासारखी मदत करण्याचा.. आणि केवळ ही मुलेच तशी मदत करीत होती असे नव्हे. अनेक वाहनचालकांनी त्यांना साथ दिली. एक छदामही न घेता ते अशिक्षित टेम्पो आणि ट्रकवाले माणसे वाहून नेत होते..

बऱ्याच रखडपट्टीनंतर असाच एक ट्रक मिळाला अखेर. आतल्यांनी हात दिला. शोधयात्राच संपल्यासारखे वाटले तेव्हा. जरा स्थिरावल्यावर बाहेर पाहिले.. ट्रकच्या मागेच एक आलिशान कार चालली होती. आत एकटाच चालक होता. समोरच्या ट्रकने ‘साइड’ द्यावी म्हणून सतत हॉर्न वाजवत होता..