News Flash

वस्त्यांमध्ये दाणादाण

घरांत पाणी साचल्याने रात्रभर नागरिकांचे हाल; सखल भाग पुन्हा पाण्याखाली

घरांत पाणी साचल्याने रात्रभर नागरिकांचे हाल; सखल भाग पुन्हा पाण्याखाली

मुंबई : गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाने सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईत दमदार हजेरी लावली आणि मंगळवारी सकाळी मुंबईमधील मुख्य रस्त्यांसह अनेक ठिकाणचे सखलभाग जलमय झाले. मात्र त्याआधी सोमवारी मध्यरात्रीपासूनच शहरातील अनेक झोपडपट्टय़ा, वस्त्यांमधील घरांत पाणी शिरून तेथील रहिवाशांचे हाल झाले. पावसाचा जोर मंगळवारी दुपारनंतर मात्र ओसरला.

हवामान खात्याने ४ आणि ५ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे मुंबई महापालिकेने आपल्या विभाग कार्यालयांना सतर्कतेचा इशारा दिला होता. त्याचबरोबर सर्व यंत्रणांनाही सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढला आणि हळूहळू मुंबईतील सखलभाग जलमय होण्यास सुरुवात झाली. दहिसर, मिठी, पोयसर आदी विविध नद्या आणि त्यांना येऊन मिळणाऱ्या नाल्यांच्या काठांवर अनेक झोपडपट्टय़ा वसल्या आहेत. सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसामुळे झोपडपट्टय़ांमध्ये पाणी शिरले आणि झोपडपट्टीवासीयांचे अतोनात हाल झाले. नदी-नाल्यांतील पाणी वाढल्याने रहिवाशांच्या काळजाचा थरकाप उडाला होता. सखल भागातील इमारतींच्या तळमजल्यावरील घरात, दुकानांमध्ये पाणी साचले. त्यामुळे रहिवाशांचे अतोनात हाल झाले.

पावसाचा जोर मंगळवारी सकाळी ओसरला. मात्र दुपारी १२.४७ च्या सुमारास समुद्राला मोठी भरती येणार असल्याने सखल भागात साचलेले पाणी पंपाच्या साह्य़ाने उपसण्याचे काम पालिकेने युद्धपातळीवर हाती घेतले होते.

झाड कोसळून मुले जखमी

पावसाच्या तडाख्यामध्ये चेंबूरच्या एच. पी. कॉलनी परिसरातील एका घरावर मोठा वृक्ष उन्मळून पडला आणि या दुर्घटनेत दोन लहान मुले जखमी झाली. अदनान बाबू शेख (५) आणि इमान बाबू शेख (१३) अशी या मुलांची नावे आहेत. या दोघांनाही गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पावसाच्या तडाख्यात शहरातील १७, पूर्व उपनगरातील पाच, तर पश्चिम उपनगरातील २० अशी एकूण ४२ झाडे वा फांद्या पडल्याच्या घटना घडल्या.

जलमय झालेले भाग

मुंबई शहरातील  ठाकूरद्वार नाका, ग्रॅन्टरोड, नळबाजार, गोल देऊळ, जे. जे. मार्ग जंक्शन, भेंडी बाजार जंक्शन, शेख मिस्त्री दर्गा रोड, हिंदमाता, सक्कर पंचायत चौक, दादर टीटी, एसआयईएस महाविद्यालय; पूर्व उपनगरातील पोस्टल कॉलनी, चेंबूर, चुनाभट्टी बटन भवन, मानखुर्द रेल्वे स्थानक, टिळकनगर; पश्चिम उपनगरांतील अंधेरी सब-वे, दहिसर सब-वे, मालाड सब-वे, नॅशनल कॉलनी (वांद्रे).

मंत्री, महापौरांकडून पाहणी

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुसळधार पावसामुळे जलमय झालेल्या गांधी मार्केट, किंग्ज सर्कल परिसराची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल उपस्थित होते. चहल यांनी मिठी नदीकाठच्या क्रांतिनगर परिसराची पाहणी केली. तसेच येथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश दिले. महापौर किशोरी पेडणेकर यांनी कांदिवलीतील दरड कोसळलेल्या ठिकाणी भेट देऊन उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबईत सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शासकीय कार्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडून कळविण्यात आले. हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तविल्यामुळे खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये मंगळवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा मात्र कार्यरत होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 2:22 am

Web Title: slum dwellers the worst affected by heavy rain mumbai zws 70
Next Stories
1 टाळेबंदीमुळे परीट व्यवसायाची घडी विस्कळीत!
2 सज्जातून चौपाटीदर्शन परवानगीच्या फेऱ्यात
3 माहिती अधिकाराअंतर्गत दाखल अपिलांसाठी ऑनलाइन सुनावणी
Just Now!
X