यंत्रणा उभारण्यासाठी आणखी महिनाभराची प्रतीक्षा

संदीप आचार्य / निशांत सरवणकर, मुंबई झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवसांत असंख्य फायली निकालात काढल्याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर प्राधिकरणात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. झोपु प्रस्ताव ऑनलाइन हाताळण्याच्या दृष्टीने यंत्रणा विकसित करण्याची घोषणा मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र आता पाच महिने झाले तरी प्राधिकरण फायली हाताळण्याबाबत ऑफलाइन असल्याचेच दिसून येत आहे. यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागेल, असा दावा आता प्रशासनाने केला आहे.

झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रस्ताव हाताळताना अनियमितता होत असल्याचे तसेच विनाकारण कमालीचा विलंब लावला जात असल्याची बाब विश्वास पाटील यांच्या काळातील फायलींच्या चौकशीच्या निमित्ताने निदर्शनास आली. त्यामुळे प्राधिकरणातील सर्व प्रस्तावांना महापालिकेच्या धर्तीवर ऑनलाइन मंजुरी देण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे कुठल्याही अभियंत्याचा फाईलशी थेट संबंध येऊ नये आणि संपूर्ण पारदर्शकता यावी, यासाठी आवश्यक ती यंत्रणा विकसित करण्यासाठी प्राधिकरणाने पुढाकार घेतला. त्यानुसार ई-निविदा मागविण्यात आल्या. मार्चमध्ये अशा पद्धतीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला. दोन महिन्यात ऑनलाइन यंत्रणाही सुरू करण्यात येणार होती, परंतु ती अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. मात्र नागरिकांना ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून ती सुरळीत सुरू आहे. या तक्रारींची प्राधिकरणाच्या पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जातीने दखल घेतली जात आहे.

झोपुवासीयांची पात्र-अपात्रता हीदेखील थेट ऑनलाइन व्हावी, असा प्रयत्न सुरू  आहे. याशिवाय झोपु प्रस्ताव ऑनलाइन मंजूर व्हावेत, यासाठी नवे अ‍ॅप तयार केले जात आहे. ज्या कंपनीला हे अ‍ॅप विकसित करण्यासाठी देण्यात आले आहेत त्यांच्याकडून विलंब होत असल्यामुळे ऑनलाइन मंजुरीची यंत्रणा कार्यान्वित होऊ शकलेली नाही. या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता राहावी यासाठी मुंबई पालिकेकडून डीसीआरबाबतचे सॉफ्टवेअर घेण्यात आले आहे. मात्र यामध्ये झोपु प्रस्तावाच्या मंजुरीसाठी बदल करणे आवश्यक आहे. ती जबाबदारी संबंधित कंपनीवर सोपविण्यात आली असून प्राधिकरणातील तीन अभियंताही त्यासाठी पाठविण्यात आले आहे. लवकरात लवकर ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी सांगितले.

ऑनलाइन मंजुरी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विशेष पद्धतीने तयार करण्यात आलेल्या ‘अ‍ॅप’ची चाचणी सुरू आहे. झोपुवासीयांची प्रचंड संख्या लक्षात घेता ‘अ‍ॅप’ यशस्वीपणे सुरू राहावे, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. सहजसुलभ कोणालाही ते हाताळता यावे, असे प्रयत्न आहेत. अ‍ॅपची चाचणी येत्या ५ ते ६ आठवडय़ांत पूर्ण होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन केले जाईल.

– दीपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपु प्राधिकरण