|| निशांत सरवणकर

ऑनलाइन मंजुऱ्यांसाठी प्रतीक्षाच!

‘झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणा’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवसांत असंख्य फाईली निकालात काढल्याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर प्राधिकरणात पारदर्शकता आणण्यासाठी प्राधिकरणाने अखेर ‘आसरा’ हे अ‍ॅप तयार केले आहे. मुख्यमंत्र्यांनी हे अ‍ॅप मंगळवारी अधिकृतपणे कार्यान्वित केले. मात्र झोपु प्रस्ताव ऑनलाइन हाताळण्याच्या दृष्टीने याच अ‍ॅपवर यंत्रणा विकसित करण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.

झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रस्ताव हाताळताना अनियमितता होत असल्याचे तसेच विनाकारण कमालीचा विलंब लावला जात असल्याची बाब विश्वास पाटील यांच्या काळातील फाईलींच्या चौकशीच्या निमित्ताने निदर्शनास आली. त्यामुळे प्राधिकरणातील सर्व प्रस्तावांना महापालिकेच्या धर्तीवर ऑनलाइन मंजुरी देण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे कुठल्याही अभियंत्याचा फाईलशी थेट संबंध येऊ नये आणि संपूर्ण पारदर्शकता यावी, यासाठी आवश्यक ती यंत्रणा विकसित करण्यासाठी प्राधिकरणाने पुढाकार घेतला. त्यानुसार ई-निविदा मागविण्यात आल्या. मार्चमध्ये अशा पद्धतीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला. दोन महिन्यात ऑनलाईन यंत्रणाही सुरू करण्यात येणार होती. मात्र नागरिकांना ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यापलीकडे काहीही होऊ शकले नव्हते. याच पाश्र्वभूमीवर तयार करण्यात आलेले ‘आसरा’ हे अ‍ॅप आता सज्ज असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी सांगितले. तब्बल पाच महिन्यांचे प्रयत्न आणि तपासणीनंतर हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

झोपुवासीयांची पात्र-अपात्रता थेट ऑनलाइन व्हावी तसेच झोपु प्रस्ताव ऑनलाइन मंजूर व्हावेत, या दृष्टीने नवे अ‍ॅप तयार करण्यात येणार होते. परंतु हे अ‍ॅप ज्या कंपनीला विकसित करण्यासाठी देण्यात आले होते त्यांच्याकडून विलंब झाल्याने ते रखडले होते.

या प्रक्रियेत अधिक पारदर्शता यावी, यासाठी मुंबई पालिकेकडून विकास नियंत्रण नियमावलीबाबतचे सॉफ्टवेअर घेण्यात आले आहे. यामध्ये झोपु प्रस्तावाच्या मंजुरीसाठी बदल करणे आवश्यक आहे. ती जबाबदारी संबंधित कंपनीवर सोपविण्यात आली असून प्राधिकरणातील तीन अभियंताही त्यांच्यासोबत होते. ऑनलाइन मंजुरीचीही प्रक्रियाही लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही कपूर यांनी सांगितले. सध्या या अ‍ॅपवर झोपुवासीयाची सद्यस्थिती, झोपु योजनेचा तपशील, इरादा पत्र आदी माहिती उपलब्ध होणार आहे.

आपल्या मोबाइलवर ‘आसरा’ हे अ‍ॅप नागरिकांना डाऊनलोड करावे लागेल. योजनेची माहिती टाकल्यावर लगेच सद्यस्थितीची कल्पना मिळेल. याशिवाय योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. हळूहळू याच अ‍ॅपच्या माध्यमातून योजनेचे ना हरकत प्रमाणपत्र, मंजुऱ्या, भोगवटा प्रमाणपत्रही उपलब्ध होईल     – दीपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपु प्राधिकरण.