News Flash

विकास आराखडय़ात कोळीवाडय़ांना स्थान नाही!

झोपडपट्टी घोषित करण्याची तयारी

विकास आराखडय़ात कोळीवाडय़ांना स्थान नाही!
प्रतिनिधिक छायाचित्र

झोपडपट्टी घोषित करण्याची तयारी

वरळीपाठोपाठ सायन कोळीवाडा झोपडपट्टी घोषित करण्याच्या तयारीत असलेल्या शासनाने मुंबईतील एकाही कोळीवाडय़ाचा विकास आराखडय़ात समावेश केलेला नाही. त्यामुळे कोळीवाडे ही संकल्पनाच मोडीत काढण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला गेल्याची चर्चा आहे. कोळीवाडय़ांना झोपडपट्टी घोषित केल्यास त्याचा लाभ विकासकांना होणार आहे. गावठाण आणि कोळीवाडे यांना मुंबईच्या विकास आराखडय़ात अद्यापही स्थान मिळालेले नाही. याबाबत स्वतंत्र विकास आराखडा घोषित करण्यात येणार असल्याचा दावा पालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे.

वरळी कोळीवाडय़ातील तीन एकर भूखंड झोपडपट्टी घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे प्रलंबित आहे. याबाबत प्राधिकरणाने निर्णय दिल्यानंतर हळूहळू इतर विभाग झोपडपट्टी घोषित करण्यातील अडसर दूर होणार आहे. त्यामुळे या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला. त्यानंतर प्राधिकरणाने हा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम दिल्यानंतर या प्रक्रियेला खीळ बसली होती.  सायन कोळीवाडय़ाचा परिसर पालिकेमार्फत जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा परिसरही झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याअंतर्गत झोपडपट्टी घोषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु हे दोन कोळीवाडेच नव्हे तर मुंबईतील कोळीवाडेच विकास आराखडय़ातून हटविण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच प्रकाशित झालेल्या विकास आराखडय़ात सध्या अस्तित्वात असलेल्या कोळीवाडय़ांचा उल्लेखच दिसून येत नाही. त्यामुळे कोळीवाडय़ात राहणारे रहिवासी अस्वस्थ झाले आहेत. वर्षांनुवर्षे अस्तित्वात असलेल्या कोळीवाडे वा गावठाणांचा उल्लेखही करण्यात न आल्याबद्दल स्थानिकांना आश्चर्य वाटत आहे.

मुंबईत वर्सोवा, जुहू, खारदांडा, माहीम, वरळी आदी प्रमुख कोळीवाडे वर्षांनुवर्षे आहेत. परंतु या कोळीवाडय़ांचा उल्लेखही विकास आराखडय़ात नसल्याचे दिसून येत आहे. या आराखडय़ात हा परिसर दाखविण्यात आला आहे. परंतु या परिसराचा कुठल्याही नावाने उल्लेख करण्यात आलेला नाही.

अलीकडेच राज्य शासनाने जारी केलेल्या सुधारित झोपडपट्टी कायद्यात कोळी समाजाच्या मासे सुकविण्याच्या परिसराला समाजाच्या वापरासाठी असलेली जागा असे संबोधले आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव त्यावर सादर करता येऊ शकतो, असे स्पष्ट केल्याने तो परिसर या सुधारित कायद्याने झोपडपट्टी घोषित केलेला आहे. त्यामुळे कोळीवाडे वा गावठाणांना झोपडपट्टी घोषित करून विकासकांना चटईक्षेत्रफळाच्या रूपाने मोठय़ा प्रमाणात फायदा करून देण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

कोळीवाडे आणि गावठाण यांची हद्द निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर त्याचा स्पष्ट उल्लेख विकास आराखडय़ात केला जाणार आहे. २३ जून रोजी मुंबईचा अंतिम विकास आराखडा जाहीर होत आहे. त्याआधी ही प्रक्रिया पूर्ण झालेली असेल, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2018 1:17 am

Web Title: slum rehabilitation project
Next Stories
1 वीज पडून मुंबईत एकाचा मृत्यू
2 मानसिक आजारांना विमा संरक्षण नाहीच!
3 अघोषित संपासाठीही वेतनकपात?
Just Now!
X