News Flash

सायन कोळीवाडय़ावर अखेर ‘झोपु योजना’ लादलीच!

प्राधिकरणाचा पालिकेकडे अंगुलीनिर्देश

(संग्रहित छायाचित्र)

|| निशांत सरवणकर

प्राधिकरणाचा पालिकेकडे अंगुलीनिर्देश

वरळी कोळीवाडा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या कक्षेत आणण्याच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नसले तरी सायन कोळीवाडय़ावर मात्र झोपु योजना लादण्यात झोपु प्राधिकरणाला यश आले आहे.

सायन कोळीवाडा हे गावठाण असल्यामुळे तो खासगी भूखंड असताना प्राधिकरणाला झोपु योजना लादता येणे शक्य नाही, असा दावा स्थानिक नागरिकांनी पुराव्यानिशी केला असला तरी ही जुनी योजना असल्याचे कारण पुढे करून प्राधिकरणाकडून त्याबाबत काहीही कारवाई करण्यास नकार दिला जात आहे. सुहाना बिल्डर्सतर्फे सध्या ही योजना राबविली जात आहे. याप्रकरणी रहिवाशांनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे.

सायन कोळीवाडय़ाच्या मूळ मिळकत पत्रकानुसार ही कोळी जमातीची जागा असून ती तब्बल नऊ एकर आहे. यावर कामगार गृहनिर्माण संस्था तसेच आगरवाडा गृहनिर्माण संस्था तसेच १९१ भूखंडधारक आणि १९ जुनी घरे आहेत. यापैकी १९१ घरे पाडण्यात सुहाना बिल्डर्सला यश मिळाले आहे. १९ जुनी घरे पाडण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. ही घरे हजार चौरस फुटापेक्षा अधिक आहेत. ही झोपडपट्टी कशी ठरू शकते, असा सवाल वास्तुरचनाकार आरुणी पाटील यांनी केला आहे. महापालिकेने हा भूखंड आपला असल्याचे दाखवून विकासकाच्या दबावाखाली परिशिष्ट दोन जारी केले. ते बेकायदा आहे. मुळात हा भूखंड पालिकेचा नाही. तो खासगी असल्याची कागदपत्रे आपण पाठपुरावा करून मिळविली आहेत. त्यामुळे यावर झोपु योजना लादली जाऊ शकत नाही, असा आरोपही पाटील यांनी केला आहे. भूनोंदणी कायदा १९२५ नुसार मुंबईतील कोळावाडे ही खासगी भूधारकांची मालमत्ता आहे, याकडे लक्ष वेधून पाटील यांनी याबाबतची कागदपत्रे सादर केली आहेत. पालिकेच्या मालमत्ता विभागाने बळजबरीने झोपु योजना कोळीवाडय़ावर लादली असून त्याविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याबाबत प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी प्राधिकरणाची बाजू मांडताना सांगितले की, सायन कोळीवाडय़ाचा भूखंड हा पालिकेच्या मालकीचा असल्यामुळे त्या भूखंडावर झोपडपट्टी घोषित करण्याची आवश्यकता नसते. १९७२, १९९५ वा २००० च्या सर्वेक्षणानुसार फोटोपास जारी झालेला असला तरी झोपु योजनेला परवानगी देता येते. १९९८-९९ मध्ये ही योजना दाखल झाली आहे. आकार झोपु योजनेला विकास नियंत्रण नियमावली ३३ (१०) मध्ये तर शीव कोळीवाडा झोपु योजनेला ३३ (७) अंतर्गत परवानगी देण्यात आली आहे, असेही पांढरे यांनी सांगितले.

सायन कोळीवाडा हा परिसर झोपडपट्टी घोषित झालेला आहे. त्यानुसार आयओडी, सीसी तसेच आवश्यक त्या सर्व परवानग्या झोपु प्राधिकरणाने दिलेल्या आहेत. याबाबतची सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत. १९१ घरे याआधी पाडण्यात आली आहेत. ही योजना नियमानुसार आहे  – सुधाकर शेट्टी, सुहाना बिल्डर्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 2:00 am

Web Title: slum rehabilitation scheme sion koliwada
Next Stories
1 प्लास्टिकबंदी कारवाईवरून मानापमान
2 गोपनीय माहिती खासगी क्लासकडे
3 शालेय बसवाहतूकदारांचा आज संप
Just Now!
X