उड्डाणपूल हे जलद वाहतुकीचे मार्ग आहेत. शहरांतील कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच कोटय़वधी खर्च करून नवनवीन पुलांची उभारणी केली जाते. या पुलांच्या माध्यमातून शहराच्या अद्ययावत पायाभूत सुविधांचे दर्शन घडवले जाते. पण याच पुलांखाली दिसणारा कचरा, वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग, झोपडय़ा, गर्दुल्ल्यांचे अड्डे शहरांच्या बकालपणाचेही दर्शन घडवतात.

‘मुंबईतील उड्डाणपुलांच्या खाली वाहने उभी करण्यास मनाई’ अशी बातमी गेल्या आठवडय़ाभरात झळकली आणि पुलांखालील मोकळ्या जागांचा विषय पुन्हा चर्चेला आला. खरं तर राज्य सरकारने सुमारे महिनाभरापूर्वी उच्च न्यायालयात याची ग्वाही दिली होती; परंतु आजतागायत यावर काहीही कारवाई झालेली नाही. बहुतांश उड्डाणपुलांखाली आजही वाहने उभी केली जात आहेत. काही ठिकाणी तर अधिकृतपणे वाहनतळच उभारण्यात आले आहेत. हे वाहनतळ हटवले तर पार्किंगचा मोठा पेच होईल, अशी भीती यंत्रणांकडून व्यक्त केली जाते; परंतु मुद्दा केवळ पार्किंगचाच नाही. मुंबईच्या उड्डाणपुलांखाली अशी अनेक अतिक्रमणे आहेत की, जी हटवणे आता कदाचित यंत्रणांच्याही आवाक्याबाहेर गेले आहे.

mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या
Online Betting
सट्टेबाजीत दीड कोटींचं नुकसान, कर्जाच्या वसुलीसाठी धमक्या; पत्नीने उचललं टोकाचं पाऊल!
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

पुलाखालची जागा म्हणजे अतिक्रमण आणि कचरा टाकण्याची हक्काची जागा म्हणूनच पाहिले गेले आहे. काही ठिकाणी बिनदिक्कत रिक्षाथांबे किंवा रिक्षातळ बनवण्यात आले आहेत. काही ठिकाणी भंगारातील वाहने उभी करण्यात आली आहे. काही पुलांच्या खाली तर दुचाकीविक्री आणि दुरुस्तीचे धंदे मांडण्यात आले आहेत. शहरातील पुलांखाली फेकण्यात येणारा कचरा तर जणू या पुलांच्या निर्मितीमधील एखादा भाग असल्यासारखे आहे. या जागेचा जर योग्य वापर केला तर अनेक भागातील वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकते. वाहतूक तज्ज्ञांनी यासाठी अनेक पर्याय दिले आहेत.

मुंबईत सध्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा भाग म्हणजे अमर महल हा सर्वाधिक वाहतूक कोंडीचा भाग मानला जातो. या मार्गावरील एक पूल दुरुस्तीसाठी बंद आहे. यामुळे या वाहतूक कोंडीत आणखीच भर पडत आहे. यात पश्चिम उपनगरातून येणाऱ्यांना चेंबूर दिशेला जायचे असेल तर सुमारे अडीच किमीचा वळसा घालून यावे लागते. पण या मार्गावरील एका पुलाच्या खालून एक छोटा रस्ता चेंबूर दिशेला जातो. हा रस्ता फारच अरुंद आहे. यामुळे सध्या तो वाहतुकीसाठी फारसा वापरला जात नाही. ज्यांना रस्ता माहिती आहेत तेवढेच वाहनचालक येथून प्रवास करतात मात्र दोन चारचाकी एकावेळी दोन वगेवेगळ्या दिशांना जातील इतका पुरेसा रस्ताही नाही. प्रत्यक्षात रस्ता मोठा आहे मात्र त्याच्या एका कोपऱ्यात मोठय़ा प्रमाणावर कचरा आहे. हा कचरा हटवला व पुलाखालील फेरीवाल्यांना हटवून एका बाजूला जागा करून दिली तर हा रस्ता मोठा होऊन छोटय़ा चारचाकींसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे पश्चिम उपनगरातून येणारी वाहने अमरमहल जंक्शनकडे न जाता थेट चेंबूरच्या दिशेने वळतील. यामुळे अमर महल जोडरस्त्यावरील वाहूक कोंडी कमी होईल तसेच प्रवासाचा वेळ कमी होऊन इंधन बचतही होईल. हे काम करण्यासाठी अवघ्या काही लाखांचा खर्च आहे पण याकडे मात्र सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.

याचबरोबर पश्चिम द्रुतगती मार्गाखाली असलेल्या कालिना आणि वाकोला चौकांमध्येही मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. हा पूल सहा पदरी असून त्याची रुंदी तुलनेत मोठी आहे. मात्र त्याच्या खालच्या भागात केवळ चारपदीच रस्ता आहे. प्रत्यक्षात या भागात वांद्रे, बोरिवली, दहिसर अशा विविध ठिकाणांहून वाहने येतात. या वाहनांचा वावर पुलापेक्षा पुलाच्या खालून जास्त असतो. यामुळे या भागात नेहमी वाहतूक कोंडी अनुभवण्यास मिळते. यात वाहतूक शिस्त नसल्यामुळे डावीकडे आणि उजवीकडे जाणारी वाहने सरळ प्रवास करणाऱ्या वाहनांना नेहमीच अडचणीची ठरतात. वाकोला चौकात सव्‍‌र्हिस रस्ता तर उपयोगात नाही. तेथे अनेक जुनी वाहने उभी करण्यात आली आहे. हा रस्ता जर मोकळा केला तर आणखी एक मार्गिका वापरण्यायोग्य होईल. या मार्गिकांमध्ये वाहतूक शिस्त लावून डावी मार्गिका केवळ डावीकडे जाणाऱ्या प्रवशांसाठी खुली ठेवली तर त्या प्रवशांना सिग्नलसाठी थांबण्याची गरज भासणार नाही. तर उजवीकडे जाणाऱ्या प्रवाशांना पुलाच्या खालून विशेष मार्गिका दिली तर त्याही प्रवशांचा खोळंबा होणार नाही. यामुळे वाहतूक कोंडी होण्याऐवजी वाहतूक सतत सुरू राहील. या पुलाखालून एका दिशेला कलानगरकडे व दुसऱ्या दिशेला विमानतळाकडे जाणारी वाहतूक मोठय़ा प्रमाणावर असते. याचबरोबर कालिना चौकातही मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसते. या ठिकाणी जर पुलाखाली बेस्टचे मोठे स्थानक उभारून तेथे वांद्रे दिशेला व बोरिवली दिशेला जाणाऱ्या गाडय़ांसाठी विशेष मार्गिका उपलब्ध करून दिली तर दर तीन मिनिटाला एक बस दोन्ही दिशांना प्रवास करू शकेल असे वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार यांनी सांगितले. हा प्रवास जलदगतीने झाला तर जास्तीत जास्त लोक या पर्यायाचा वापर करतील व बेस्टलाही त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. हे करण्यासाठी केवळ पुलाखालील वाहनतळ बंद करावे लागेल. तसे झाल्यास या स्थानकातून सी-लिंकचा वापर करून दक्षिण मुंबई, दादर, बीकेसी, सायन, सीएसटी, सांताक्रूझ कुर्ला जोड रस्त्याचा वापर करून चेंबूर व वाशी दक्षिणेकडे लोखंडवाला, विक्रोळी, ऐरोली, दहिसर, बोरिवली, घोडबंदर अशा ठिकाणी बस सेवा पुरविता येऊ शकते. याच पुलाखाली उजवीकडे वळण्यासाठी दोन विशेष मार्गिका दिल्यास वाहने न थांबता उजवीकडे वळू शकतील. तसेच हा चौक सुरू होण्याआधीच जर यू-टर्नची सुविधा दिली तर चौकात येणाऱ्या त्या वाहनांची संख्याही कमी होईल अशी अपेक्षा दातार यांनी व्यक्त केली आहे.

असे एक ना अनेक पर्याय शोधून काही लाख रुपये खर्च करून पुलाखालीची जागा वाहतुकीसाठी वापरल्यास मुंबईत सध्या जाणवत असलेली वाहतूक समस्या मोठय़ा प्रमाणावर कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ज्या पुलाखाली वाहतूक व्यवस्था करणे शक्य नाही तेथे जॉगिंग ट्रॅक अथवा लहन मुलांना खेळण्यासाठी बागा, कलादालने उभारता येऊ शकतील. हे सर्व करण्यासाठीचा खर्च कमी आहे; परंतु इच्छाशक्ती दांडगी लागते. तशी इच्छाशक्तीच नसल्याने मुंबईतील उड्डाणपूल हे वरून वाहतुकीचे जलद मार्ग आणि खालून मुंबईच्या बकालपणाचे उदाहरण ठरू लागले आहेत.

नीरज पंडित @nirajcpandit

Niraj.pandt@expressindia.com