06 August 2020

News Flash

टी-शर्ट छपाईकडे छोटय़ा मंडळांचाही ओढा

नेक कारखान्यांना सध्या दिवसरात्र टी-शर्ट छपाईची कामेच सुरू असल्याचे दिसत आहे.

नेक कारखान्यांना सध्या दिवसरात्र टी-शर्ट छपाईची कामेच सुरू असल्याचे दिसत आहे.

छपाई व्यावसायिकांचा उद्योग तेजीत

गणरायाचा आगमनापासून ते विसर्जनापर्यंत मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये एकसंधपणा दिसण्यासाठी मंडळाचे नाव असलेले टी-शर्ट छापून घेण्याकडे आता मोठय़ा गणेशोत्सव मंडळांसोबत छोटय़ा मंडळांचाही कल वाढत आहे. आपले मंडळ उठून दिसावे, यासाठी आकर्षक रंगातील तसेच डिझाइनचे टी-शर्ट घेऊन त्यावर मंडळाचे नाव छापून घेण्याचे प्रकार वाढत असल्याने टी-शर्ट व्यावसायिकांसोबतच छपाई उद्योजकांनाही तेजीचे दिवस आले आहेत. अनेक कारखान्यांना सध्या दिवसरात्र टी-शर्ट छपाईची कामेच सुरू असल्याचे दिसत आहे.

मोठमोठय़ा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते एकाच प्रकारचा वेश परिधान करतात. मंडळाचे नाव व बोधचिन्ह असलेला कुर्ता, सदरा किंवा टी-शर्ट घालून गणेशोत्सव मंडपात वावरणारे कार्यकर्ते बहुतेक सर्वच मोठय़ा गणेशोत्सव मंडळांमध्ये दिसून येतात. विशेषत: गणपती आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या वेळी सारखेच वेश परिधान केलेले कार्यकर्ते साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतात. त्यामुळेच आता छोटी मंडळेही असे टी-शर्ट छापून वा बनवून घेण्यावर भर देत आहेत. साहजिकच त्यामुळे टी-शर्ट छपाई व्यावसायिकांचा भाव वधारला आहे. ‘मंडळांना त्यांच्या मागणीनुसार आणि ग्राहकांच्या पसंतीचा विचार करून किरकोळ बाजारातील दुकानदारांना छपाई व्यावसायिक घाऊक स्वरूपात टी-शर्ट विक्री करतात. गणपती मंडळांच्या टी-शर्टची छपाई करताना मंडळांप्रमाणे त्याचे घोषवाक्य, बोधचिन्ह आणि रंगसंगती यांची बनावट नव्याने करावी लागते,’ अशी माहिती ‘होडगे क्रिएटिव्ह हब’चे प्रकाश होडगे यांनी दिली. मंडळांच्या अपेक्षेनुसार टी-शर्टवर विविध प्रकारचे नक्षीकाम वा ‘फोटोइफेक्ट’ करण्यासाठी ‘फोटोशॉप’ निपुण कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागत असल्याचेही ते म्हणाले.  यंदा केवळ गणेशोत्सवासाठी दहा हजार टी-शर्टची छपाई करत असल्याची माहिती ‘श्री स्पोर्ट’चे अमित वालगुडे यांनी दिली. सर्वाधिक कमाई गणेशोत्सवातच होत असल्याचेही त्यांनी सांगितले. कारख्यान्यांना पुरवठा करणारे कापड दिल्ली आणि लुधियानावरून येते. त्यामुळे दलालीमुळे होणारा वाढीव खर्च टाळण्यासाठी तेथूनच छपाईचा निर्णय घेतला.

विक्रीतून मंडळाला हातभार

साधारण तीनशे ते साडेतीनशे रुपयांपर्यंत या टी-शर्टची विक्री मंडळाकडून केली जाते. घाऊक स्वरूपात टी-शर्टची खरेदी करून त्यांची विक्री करताना पन्नास-शंभर रुपये अधिकचे आकारले जातात. त्यामुळे मंडळाच्या खर्चाला हातभार लागत असल्याचे चिंचपोकळी सार्वजनिक मंडळाच्या एका कार्यकर्त्यांने सांगितले. चिंचपोकळी चिंतामणी गणेश मंडळाच्या टी-शर्टना मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मोठी मागणी आहे. मंडळाने यंदा २२ हजार टी-शर्टची छपाई केली आहे. केवळ दोन दिवसांत बावीस हजार टी-शर्टची विक्री झाल्याची माहिती मंडळाचे सभासद गणेश गावडे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2017 3:47 am

Web Title: small ganesh mandal to print t shirt for volunteers
Next Stories
1 पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया लांबणीवर
2 निकालाच्या विलंबाबाबत खुलासा करा!
3 ‘बेटरमेंट’साठी प्रवेश रद्द करण्याची घाई
Just Now!
X