‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी) अर्थात सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे इंटरनेटला जोडली जाणे यामुळे उपकरणे अधिकाधिक तल्लख होत असून हेच जगाचे भविष्य असेल आणि देशसुरक्षेसमोरील सर्वात मोठे आव्हानदेखील, असे प्रतिपादन सायबर सुरक्षा या विषयातील तज्ज्ञ आणि मर्क टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुवम मिश्रा यांनी बुधवारी येथे केले. भारतीय नौदलातर्फे आयोजित दोन दिवसांच्या माहिती तंत्रज्ञान परिसंवादामध्ये ‘स्मार्टफोननंतरच्या दुनियेतील सुरक्षाविषयक आव्हाने’ या विषयावर सुवम मिश्रा बोलत होते.
मिश्रा पुढे म्हणाले की, स्मार्टफोनमध्ये ठिकाण ओळखण्याची असलेली सोय वापरून स्फोट घडविला जाऊ शकतो. हा स्फोट कुणा व्यक्तीने घडवलेला नसेल तर त्यात केलेल्या प्रोग्रॅमनुसार उपकरणानेच स्फोट घडवताना घेतलेला तो निर्णय असेल. अशा या उपकरणांमध्ये घुसखोरी करून देशविघातक कृत्ये घडविली जाऊ शकतात. ही उपकरणे हेच आपल्या सर्वाचे भविष्य आहे. ते टाळता येणार नाही. पण भविष्यात काय वाढून ठेवले आहे, त्याचा विचार करून आपल्याला धोका ओळखून पावले उचलायला हवीत. तत्पूर्वी मुंबई आयआयटीमधील प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक फाटक यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन झाले. आपल्या बीजभाषणात ते म्हणाले की, सकृद्दर्शनी हॅकिंगची लहानशी वाटणारी घटना हा देशसुरक्षेवरचा मोठा हल्ला असू शकतो, असे अलीकडे तज्ज्ञांना लक्षात आले आहे. देशाच्या माहितीसाठय़ावर झालेला हल्ला देशाला कोणत्याही युद्धाशिवाय पराभूत करण्याची क्षमता राखतो. त्यामुळेच आताच्या युगात देशाच्या सीमासुरक्षेएवढेच महत्त्व देशाच्या माहितीसाठय़ाच्या रक्षणालाही आहे. मेक इन इंडियाला प्राधान्य
भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल एस पी एस चिमा म्हणाले की, आपली सायबर सुरक्षा यंत्रणा ही सर्व बाबी हाताळण्यासाठी सक्षम आहे. मेक इन इंडियाला नौदलाने पूर्वीच सुरुवात केली आहे. नौदल वेगवेगळ्या देशांतील कंपन्यांकडून वेगवेगळ्या यंत्रणा विकत घेते. यांचे इलेक्ट्रॉनिक जोडकाम आपल्याला हवे तसे करण्यात भारतीय नौदलातील तज्ज्ञ वाकबगार आहेत, असे तज्ज्ञ जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाहीत. आमची ही बलस्थाने भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या बलस्थानांना जोडली गेली तर देशसुरक्षा अधिक पक्की होईल, असेही चिमा म्हणाले.

मोबाइल, टीव्ही, फ्रिज अथवा डिशवॉशर या इलेक्ट्रॉनिक वस्तू यापुढे इंटरनेटशी जोडलेल्या असतील. त्यांच्यात स्वत:च निर्णय घेण्याची क्षमता असेल. या उपकरणांमध्ये माहिती रेकॉर्ड करणे, वाचणे, विश्लेषण करणे आणि ती पाठविण्याचीही क्षमता आहे. अशा वेळेस या स्मार्ट उपकरणांमधून आपल्या नकळत गोळा केली जाणारी माहिती हे सर्वात मोठे व महत्त्वाचे आव्हान असेल.  
   -सुवम मिश्रा, सायबर सुरक्षातज्ज्ञ