पालिका शाळांत विद्यार्थ्यांची गळती रोखण्याचा उपाय लांबणीवर

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबावी, मध्येच शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळावी यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट चिप’ असलेले ओळखपत्र देण्याची घोषणा  तीन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, महापालिकेला त्यासाठी यंदाही  मुहूर्त सापडलेला नाही.

महापालिका शाळांमधून सुमारे साडेतीन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात.  काही वर्षांपासून या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरत आहे. विद्यार्थी शाळा सोडून जात असल्याने त्या बंद करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. विद्यार्थ्यांची ही गळती  थांबविण्यासाठी महापालिकेने विद्यार्थ्यांना २७ शालोपयोगी वस्तू देण्याची योजना सुरू केली. गणवेश, बूट-मोजे, वह्य़ा, पुस्तके, शाळेचे दप्तर यांचा यात समावेश आहे. मात्र तरीही विद्यार्थ्यांची गळती सुरूच राहिल्याने या विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट ट्रॅकिंग चिप’ आणि ‘ट्रान्समीटरसह रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळखपत्र’ देण्याची घोषणा तीन वर्षांपूर्वी करण्यात आली होती.  या बाबतची मागणी पालिकेच्या एम-पूर्व प्रभाग समिती अध्यक्षा समृद्धी काते यांनी एका ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. त्यावर महापालिका प्रशासनाने आपला अभिप्राय पाठवला आहे.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सध्या लॅमिनेशन केलेले ओळखपत्र देण्यात येत असून त्याचे कंत्राटही देण्यात आले आहे. त्यामुळे तूर्तास वेगळ्या ओळखपत्राचा विचार करणे शक्य होणार नाही, असे महापालिका आयुक्तांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे. मात्र विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट  ट्रॅकिंग चिप’ आणि ‘ट्रान्समीटरसह रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळखपत्र’ देण्याबाबत माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून पडताळणी करण्यात येईल. त्यानंतरच याबाबतचा  निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.