ओळखपत्रातील ‘चिप’द्वारे विद्यार्थ्यांची गळती रोखण्याचा प्रयत्न

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबावी, घर ते शाळादरम्यान विद्यार्थ्यांना इजा झाल्यास त्याची माहिती मिळावी, तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना ‘स्मार्ट ट्रॅकिंग चिप’ व ‘ट्रान्समीटरसह रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन कार्ड’ देण्याबाबतची पडताळणी पालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून करण्यात येणार आहे. पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट ट्रॅकिंग चिप’ व ‘ट्रान्समीटरसह रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन कार्ड’ देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या आठ माध्यमांच्या शाळा ठिकठिकाणी सुरू असून त्यामध्ये तब्बल ३.५ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या दोन-तीन दशकांमध्ये शहर भागातील रहिवाशांनी मोठय़ा प्रमाणावर पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये स्थलांतर केले. दरम्यानच्या काळात मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर कॉन्व्हेन्ट शाळा सुरू झाल्या. त्याच वेळी पालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा घसरत गेला. या विविध कारणांमुळे पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरत गेली. त्यामुळे अनेक शाळा बंद करण्याची वेळ पालिका प्रशासनावर ओढवली. तसेच विद्यार्थ्यांची होणारी गळती रोखणे पालिकेला अवघड बनले होते. हा प्रकार लक्षात घेऊन पालिकेने विद्यार्थ्यांना २७ शालोपयोगी वस्तू देण्याची योजना सुरू केली. या योजनेनुसार विद्यार्थ्यांना गणवेश, बूट-मोजे, वह्य़ा, पुस्तके, शाळेची बॅग इत्यादी २७ वस्तू देण्यास सुरुवात केली आहे. मात्र या वस्तू देण्यात येत असल्या तरी शाळेमधील विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचे प्रमाण लक्षणीय आहे.

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांमधील त्यांची उपस्थिती वाढावी याचा विचार करून त्यांना ‘स्मार्ट ट्रॅकिंग चिप’ व ‘ट्रान्समीटरसह रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन कार्ड’ देण्यात यावे, अशी मागणी पालिकेच्या एम-पूर्व प्रभाग समितीच्या अध्यक्षा समृद्धी काते यांनी शिक्षण समिती अध्यक्षांना पत्र पाठवून केली होती. शिक्षण समिती अध्यक्षांनी हे पत्र अभिप्रायासाठी पालिका आयुक्तांकडे सादर केले होते. पालिका आयुक्तांनी या पत्रावर आपला अभिप्राय सादर केला आहे.

विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट ट्रॅकिंग चिप’ व ‘ट्रान्समीटरसह रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन कार्ड’ देण्याबाबत पालिका आयुक्त आहेत. सध्या पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना लॅमिनेशन केलेले ओळखपत्र देण्यात येत असून त्याबाबतचे कंत्राट कंत्राटदाराला देण्यात आले आहे. त्यामुळे तूर्तास वेगळ्या ओळखपत्राचा विचार करणे शक्य होणार नाही, असे आयुक्तांनी अभिप्रायात म्हटले आहे. मात्र विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि उपस्थितीमध्ये वाढ व्हावी यादृष्टीने त्यांना ‘स्मार्ट ट्रॅकिंग चिप’ व ‘ट्रान्समीटरसह रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन कार्ड’ देण्याबाबत माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून पडताळणी करण्यात येईल, असेही आयुक्तांनी अभिप्रायात नमूद केले आहे.