मुंबई : धूम्रपान व करोनाचा काहीही संबंध नाही, असा दावा सिगारेट उत्पादकांकडून केला जात असल्याची माहिती राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. त्यावर करोनाआधी धूम्रपानाने फुप्फुसावर परिणाम होतो असे संशोधनातून वाचले होते, असे नमूद करत न्यायालयाने सिगारेट उत्पादकांच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला. एवढेच नव्हे, तर सरकारला उत्पादकांचा हा दावा पटतो का, असा उपरोधिक प्रश्नही केला.

करोना उपचारांशी संबंधित याचिकांवर गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याबाबत विचारणा केली. त्या वेळी या मुद्द्यावर सिगारेट उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद येत आहे. त्यात करोना व धूम्रपानाचा काहीही संबंध नसल्याचा दावा करणारे पुरावे सादर केले जात असल्याचे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. त्याचा आणि अन्य बाबींचा अभ्यास करून निष्कर्ष काढला जाईल, असेही सरकारतर्फे  न्यायालयाला सांगण्यात आले.

थोडा इतिहास…

करोना हा फुप्फुसांवर परिणाम करतो. संसर्ग होणाऱ्या रुग्णांमध्ये धूम्रपान करणाऱ्यांची किती संख्या आहे. याबाबत संशोधन झाले आहे का, वा करण्यात येत आहे का, याबाबत माहिती घेऊन सांगण्याचे आदेश राज्य व केंद्र सरकारला दिले होते. तसेच करोना असेपर्यंत धूम्रपानावर तात्पुरती बंदी घालण्याची सूचनाही न्यायालयाने केली होती.