संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकार केलेल्या बिबटय़ांची कातडी, हाडे आणि इतर अवयवांची परदेशात तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाचवा फरार आरोपी पंकज पटेल याला अटक केली आहे. या तस्करीसाठी बिबटय़ांना गोळ्या घालून ठार केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मागील आठवडय़ात गुन्हे शाखेच्या युनिट ११ ने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चार कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना बिबटय़ाच्या शिकारीप्रकरणी अटक केली होती. याबद्दल माहिती देताना पोलीस उपायुक्त अंबादास पोटे यांनी पाचव्या आरोपीला अटक केल्याचे सांगितल़े तसेच बिबटय़ांचे कातडे तसेच हाडे परदेशात औषधासाठी विकली जात असल्याचा पोलिसांचा संशय असून त्या दिशेने तपास सुरू असल्याचेही सांगितले. आरोपींचे नेमके गिऱ्हाईक कोण होते, त्याचाही शोध सुरू आहे. ही टोळी शिकारीची ऑर्डर घेऊन शिकार करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. बिबटय़ाचे कातडे चार ते पाच लाखांना विकले जायचे. ज्या बंदुकीने शिकार केली जायची ते अद्याप हस्तगत करण्यात आलेले नाही. या सर्व आरोपींना २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.