इस्थर अनुह्याची हत्या केल्यानंतर नाशिकला जाऊन चंद्रभान सानपने बायकोपुढे गुन्ह्याची कबुली दिली होती. पण हे कृत्य दारूच्या नशेत केल्याचे सांगत त्याने माफी मागितली होती. मात्र पत्नीने त्याच्याशी अनेक दिवस अबोला धरला होता, अशी माहिती पुढे आली आहे.
इस्थरची हत्या केल्यानंतर त्याच रात्री चंद्रभान सानप याने नाशिक गाठले होते. तेथे त्याची तिसरी पत्नी आणि १४ महिन्यांचा मुलगा असतो. त्याच्या पत्नीला त्याच्या गुन्हेगारी कृत्यांची माहिती होती. सानपने तिला इस्थरची हत्या केल्याची कबुली दिली आणि यापुढे दारूला हात लावणार नाही, असे सांगत माफी मागितली. यानंतर पत्नीने त्याच्याशी अबोला धरला होता.
सानपने ८ जानेवारीला मुंबईत येत असताना त्याने इस्थरचा लॅपटॉप रस्त्यात फेकून दिला होता. तो शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, बुधवारी गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने आंध्रप्रदेशातील मछलीपट्टण येथे इस्थरच्या घरी जाऊन तिचे वडील एस.जे.प्रसाद यांची भेट घेतली. एक तास झालेल्या या भेटीत त्यांनी चंद्रभान सानपचा या गुन्ह्यातील सहभाग समजावून सांगितला. परंतु इस्थरच्या वडिलांचे समाधान झाले नाही. एकापेक्षा अधिक व्यक्ती या गुन्ह्यात सहभागी असाव्यात, अशी शंका त्यांनी बोलून दाखवली.
या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. बुधवारी चंद्रभानची आई, बहीण यांचे जबाब गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले. मात्र त्याच्या अंथरूणात असलेल्या वडिलांना अद्याप याबाबत माहिती दिलेली नाही.