भारतीय चित्रपटांचं गाण्यांशिवाय पान हलत नाही. चित्रपट संगीतावर अनेक गायिकांची छाप असली तरी महिला संगीतकार फारशा आढळत नाहीत. उषा खन्ना यांचा काय तो अपवाद. सध्याच्या पिढीत ही परंपरा चालवत आहे, संगीतकार स्नेहा खानवलकर! स्नेहाचे नाव सध्या खूप चर्चेत आहे ते गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटातील आगळ्यावेगळ्या गाण्यांमुळे. लोकसंगीत आणि पाश्चात्त्य संगीत या दोहोंचा मिलाफ करून स्नेहाने अनेक नवी गाणी आपल्यासमोर आणलेली आहेत. स्नेहा आज म्हणजे बुधवारी व्हिवा लाउंजमध्ये आपल्या भेटीला येत असून या निमित्ताने तिच्या संगीतमय प्रवासाविषयी आपल्याला जाणून घेता येणार आहे.
‘गँग्ज ऑफ वासेपूर’ भाग १ व २ पाहिल्यावर त्यातील गाणी अनेकजण गुणगुणताना दिसले. स्नेहाचं ‘ओ वुमनिया’, ‘कह के लुंगा’ ही गाणी सर्वाच्याच तोंडी आहेत. या गाण्यांचा जन्म आणि ही गाणी तयार करताना नेमकं काय करावं लागलं या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला तिच्याकडून जाणून घेता येणार आहेत.  
स्नेहा आज या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करू पाहते आहे. लोकसंगीत आणि पाश्चात्त्य संगीत या दोहोंचा मिलाफ करून स्नेहाने अनेक नवी गाणी आपल्यासमोर आणली आहेत. तिच्या याच संगीतमय प्रवासाविषयी वाचकांना अधिक जाणून घेता येणार आहे.
 प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिराच्या पु. ल. देशपांडे मिनी थिएटरमध्ये २३ जानेवारी या दिवशी दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होणार असून त्यासाठी सर्वाना खुला प्रवेश आहे.
‘तिच्या विजयासाठी’ अशी टॅगलाइन असलेला व्हिवा लाउंज हा कार्यक्रम अल्पावधीत सर्वाच्या पसंतीस उतरला आहे. व्हिवा लाउंजच्या माध्यमातून आतापर्यंत अभिनेत्री सोनाली बेंद्रे, नेमबाज अंजली भागवत, खासदार सुप्रिया सुळे, आघाडीची गायिका बेला शेंडे, आरजे मलिष्का, डॉ. रश्मी करंदीकर, दिग्दर्शिका गौरी शिंदे, पटकथा लेखिका ऊर्मी जुवेकर अशा मान्यवर महिलांशी संवाद साधण्यात आला आहे.