प्रशासनाकडून विकासकामांसाठी मिळालेल्या १०० कोटी रुपये निधीचे वाटप करताना महापौर लाच मागत असल्याचा गौप्यस्फोट करणारी ऑडिओ क्लिप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना उपलब्ध करून दिल्याने खळबळ उडाली. कंत्राटदाराकडून आलेल्या पत्रानुसार आपण निधी दिल्याचे महापौर स्नेहल आंबेकर यांनी सांगितल्याचे या क्लिपमध्ये ऐकण्यात येते आहे. स्नेहल आंबेकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी, अशी मागणी देशपांडे यांनी केली.
अर्थसंकल्पाला सभागृहात मंजुरी देण्यापूर्वी प्रशासनाने महापौरांना विकासकामांसाठी १०० कोटी रुपये निधी दिला आहे. या निधीचे वाटप करण्याचे अधिकार महापौरांना आहेत. सर्वसाधारणपणे आजवर महापौर राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना विश्वासात घेऊन या निधीचे वाटप करीत आले आहेत. मात्र, स्नेहल आंबेकर यांनी केवळ सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षांतील काही नगरसेवकांना वैयक्तिकरित्या या निधीचे वाटप सुरू केले. या वाटपासाठी त्यांनी कंत्राटदारांची मदत घेतल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला.
उभयतांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप संदीप देशपांडे यांनी सोमवारी माध्यमांकडे दिली. या गौप्यस्फोटामुळे शिवसेना नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.