मुंबई महापालिकेच्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यावरून काँग्रेसने शुक्रवारी मध्यरात्री पालिका सभागृहात गोंधळ घातला. मात्र शिवसेना-भाजप नगरसेवकांच्या संख्याबळावर महापौरांनी अर्थसंकल्प मंजूर केला. यामुळे संतापलेल्या काँग्रेस नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात गोंधळ घातला. तसेच महापौरांनी तब्बल अर्धा तास त्यांच्या दालनातच कोंडून ठेवले. या प्रकारामुळे शिवसेना नगरसेवकही संतप्त झाले असून सभागृहाच्या बैठकांमध्ये काँग्रेस नगरसेवकांना शह देण्याची तयारी  सुरू केली आहे.
महापालिकेच्या आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पावर गेल्या बुधवारपासून चर्चा सुरू झाली आहे. स्थायी समितीच्या वाटय़ाला आलेल्या निधीचे समान वाटप न झाल्याने काँग्रेसने गोंधळ घालून या चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र महापौर स्नेहल आंबेकर यांनी काँग्रेसच्या सहा नगरसेवकांना १५ दिवसांसाठी निलंबित केल्यामुळे प्रकरण चिघळले. अखेर विरोधी पक्षनेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली. पालिका सभागृहात गुरुवारी रात्री १.३० वाजेपर्यंत अर्थसंकल्पावर नगरसेवकांची भाषणे सुरू होती. शुक्रवारी दुपारी १२ वाजता चर्चा सुरू झाली. विविध पक्षांच्या ५५ नगरसेवकांची भाषणे झाल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात
आली.
अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यापूर्वी काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी शिवसेना-भाजप युतीने मतदारांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली, तर राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी मुंबईकरांवर टाकण्यात आलेल्या अतिरिक्त भारावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्र सोडले. अर्थसंकल्पावर सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांचे भाषण झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी मतदान घेण्याची मागणी केली. मात्र आंबेकर यांनी या मागणीकडे दुर्लक्ष करीत शिवसेना-भाजपच्या संख्याबळाच्या जोरावर अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आणि सभागृहाची बैठक तहकूब करून त्या आपल्या दालनात निघून गेल्या.
आपल्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या  महापौरांच्या दालनाकडे काँग्रेस नगरसेवकांनी मोर्चा वळविला. काँग्रेस नगरसेवकांनी महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी करून पालिका मुख्यालय दणाणून सोडले. काँग्रेस नगरसेवकांनी महापौरांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवले. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादीच्या मध्यस्थीमुळे महापौरांची सुटका झाली.

आयुक्तांवर नाराजी
पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पाच्या अंदाजपत्रकावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर नियमानुसार आयुक्त त्यावर भाष्य करतात. मात्र आपली तब्येत बरी नसल्याचे कारण पुढे करून सभागृहात भाष्य करण्याची जबाबदारी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांच्यावर टाकली होती. सीताराम कुंटे यांच्या या कृतीबद्दल नगरसेवक नाराज झाले होते.