नेबरहूड विंटर फेस्टिव्हलची सुरुवात यावेळी प्रसिद्ध गायिका लोर्ना यांच्या कार्यक्रमाने झाली. लोर्ना यांच्या आवाजावर थिरकणाऱ्या तरुणांना रविवारपासून वांद्रे पश्चिमेला फुटबॉल स्पर्धेची चुरसही अनुभवता येणार आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी आयोजित केलेल्या या फेस्टिव्हलमध्ये सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांची रेलचेल आहे.
तरुणाईच्या आवडीच्या विषयांना घेऊन आयोजित करण्यात येणाऱ्या या फेस्टिव्हलचा प्रतिसाद दरवर्षी वाढत आहे. कार्टर रोड येथील अ‍ॅम्फी थिएटर येथे ठेका धरायला लावणाऱ्या कार्यक्रमाने या फेस्टिव्हलची सुरुवात होते. यंदा प्रसिद्ध कोंकणी गायिका लोर्ना यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नाताळाच्या रॉक अ‍ॅण्ड रोलमध्येही १२०० हून अधिक तरुण आणि तरुणी सहभागी झाले होते. फेस्टिव्हलची ही मजा नववर्षांतही सुरू राहणार आहे.
फुटबॉलची धूम
३८ फुटबॉल संघांचा सहभाग असलेली स्पर्धा सुपारी टँक मदान येथे सुरू झाली असून, १४, १७ आणि २१ वयोगटाखालील मुले व खुल्या गटात मुले व मुली असे संघ या स्पध्रेत सहभागी होणार आहेत. २ आणि ३ जानेवारी रोजी ‘एथलेटिक मिट’ होणार असून यात सुमारे ८०० स्पर्धक सहभागी होतील. ५ आणि ६ जानेवारी रोजी व्हॉलीबॉल स्पर्धा ७, ८ आणि ९ जानेवारी रोजी बॉलीवूड नृत्य स्पर्धा, १० जानेवारी रोजी बॉक्स क्रिकेट स्पर्धा तसेच १६ आणि १७ जानेवारी रोजी इंद्रकली फ्युजन व अांतरराष्ट्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे.