मान्सूनच्या आगमनापासूनच पावसाने मुंबईकडे वळवलेली कृपादृष्टी मंगळवारीही कायम ठेवली. आतापर्यंत मुंबईत कुलाब्यात ७८८.१ मिमी आणि सांताक्रुझमध्ये ७७४.३ मिमी एवढा पाऊस झाला असून हे मोजमाप एकूण वार्षिक पावसाच्या ३५ टक्के आहे.
२००५मध्ये झालेल्या मुसळधार पावसाच्या वेळी पालिकेने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानंतर गेल्या सात वर्षांत असा इशारा एकदाही देण्यात आला नव्हता. मात्र रविवारी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी नागरिकांना शक्यतो घरीच राहण्याचा सल्ला दिला होता. मंगळवारी दिवसभर आकाशात ढगांची दाटी होती. त्याचबरोबर अगदी रिमझिम संततधार होती. दिवसभरात कुलाबा परिसरात २३.६ मिमी आणि सांताक्रुझ वेधशाळा परिसरात ४७.३ मिमी पाऊस झाला. येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.