मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबतचे आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याच्या कारणावरुन, मुंबईतील माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शुक्रवारी शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. तर, मदन शर्मा यांनी आज या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर, माध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं आहे. मी आतापासून ‘भाजपा-आरएसएस’ सोबत आहे, असं त्यांनी जाहीर केलं आहे.

“आतापासून मी भाजपा-आरएसएस सोबत आहे. जेव्हा मला मारहाण झाली, तेव्हा त्यांनी मी भाजपा-आरएसएस सोबत असल्याचे माझ्यावर आरोप केले होते. तर आता मीच हे जाहीर करतो की, आतापासून मी भाजपा-आरएसएस सोबत आहे.” अशी शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेतल्यानंतर माध्यमांसमोर ही घोषणा केली.

आणखी वाचा- ठाकरे सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, राज्यपालांकडे मागणी

तसेच, राज्यपालांकडे आपण राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असल्याची माहिती देखील त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. भाजपा नेते अतुल भातखळकरदेखील यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने माफी मागितली पाहिजे असं ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी सहा शिवसैनिकांना पुन्हा अटक

आणखी वाचा- तडजोड,लाचारीमुळे व्यवसाय होतो, पण ब्रॅण्ड रसातळाला जातो, संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर निशाणा

शिवसैनिकांना पुन्हा अटक
मारहाण केल्याप्रकरणी सहा शिवसैनिकांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. आज या सगळ्यांना कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे. उद्धव ठाकरेंबाबतचे आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याच्या कारणावरुन माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शुक्रवारी मुंबईत मारहाण करण्यात आली होती. यानंतर १२ सप्टेंबरला या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली. आता रात्री उशिरा या सगळ्यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून त्या सगळ्यांना कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे.