मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राज्यतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसेच अध्यक्ष शरद पवार यांनी देखील गृहमंत्र्यांच्या भविष्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असं सांगून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“शिवसेनेने महाराष्ट्राचे गृहमंत्र्याच्या वागणुकीवर शंका उपस्थित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले आहेत की, गृहमंत्र्यांच्या भविष्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी करावा, मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत आणि मौन बाळगून आहेत. मग कारवाई करण्यापासून मुख्यमंत्र्यांना कुणी रोखलं आहे?” असा सवाल संजय निरूपम यांनी केला आहे.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटींची वसूली करण्यास सांगितलं होतं, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे मोठा राजकीय धुरळा उडाला. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देशमुख यांना रोखठोक सदरातून सवाल उपस्थित केला होता. त्याची चर्चा सुरू असताना देशमुख यांनी प्रकरणावर भाष्य केलं आहे.

सत्य समोर येईल; राऊतांच्या गौप्यस्फोटानंतर गृहमंत्री देशमुखांनी सोडलं मौन

“माजी पोलीस आयुक्तांनी माझ्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्व आरोपांची चौकशी केली जाईल आणि जे काही सत्य आहे, ते समोर येईल” , असं देशमुख यांनी म्हटलं आहे.