07 August 2020

News Flash

गावाकडील वृद्धांच्या काळजीने वाळीत कुटुंब काळवंडले!

वाळीत प्रथेविरुद्धचा संघटित एल्गार महाडमधील चवदार तळ्याच्या साक्षीने उमटत असतानाच, या प्रथेची पाळेमुळे रायगड जिल्ह्य़ापलीकडे रत्नागिरी जिल्ह्य़ातही रुजली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

| February 16, 2015 01:56 am

वाळीत प्रथेविरुद्धचा संघटित एल्गार महाडमधील चवदार तळ्याच्या साक्षीने उमटत असतानाच, या प्रथेची पाळेमुळे रायगड जिल्ह्य़ापलीकडे रत्नागिरी जिल्ह्य़ातही  रुजली असल्याचे स्पष्ट झाले आहे. चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील गोपाळवाडीतील मनोहर तुकाराम साबळे यांच्या वडिलांच्या निधनानंतर या कुटुंबावर गावाने टाकलेले बहिष्काराचे सुतक अजूनही दूर झालेले नाही. पोलीस, सरपंच, जिल्हाधिकारी, आणि तंटामुक्ती समित्यांनीदेखील गावकीच्या दंडेलीपुढे गुडघे टेकले असून आता आपणही गावकीला शरण जावे असा हतबल विचार या कुटुंबात बळावू लागला आहे.
मनोहर साबळे यांचे घर मार्गताम्हाने येथील गोपाळवाडीत असले तरी ते मुंबईत बोरीवली येथे राहतात. त्यांची ८५ वर्षांची आई, वृद्ध काका-काकी गावाकडे असतात. डिसेंबर २०१३ मध्ये मनोहर साबळे यांच्या वडिलांचे निधन झाले. पुरोगामी विचारांचा प्रभाव असलेल्या साबळे कुटुंबाने वडिलांच्या १२ व्या दिवसाचे विधी केले नाहीत, म्हणून वाडीने त्यांच्यावर बहिष्कार जाहीर केला, आणि गावी राहणाऱ्या वडीलधाऱ्यांची अक्षरश परवड सुरू झाली. उभ्या गावाने पाठ फिरविल्यामुळे एकाकी झालेली तीन वृद्ध माणसे गेले वर्षभर भीती, उपेक्षा, अपमान आणि असहकार झेलत घराच्या भिंतीआड वावरत आहेत. गेल्या डिसेंबरात साबळे यांच्या एका नातेवाईकांचे निधन झाले, तेव्हा या तिघांना अंत्यविधीस येण्यास गावातील लोकांनी विरोध केला. आता गावात होणाऱ्या कोणत्याही कौटुंबिक सण, समारंभास हजर राहण्यास या वृद्धांना आणि साबळे यांच्या मुंबईतील कुटुंबास मनाई करण्यात आली आहे.  मनोहर साबळे यांनी या वाळीत प्रकरणाचा सारा पाढा पोलिसांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोरही वाचला आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ात वाळीत प्रकरणाने दापोली तालुका काही महिन्यांपूर्वी प्रकाशात आला  होता. खेड-सणवस येथेही असाच प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी मध्यस्थी करून कायद्याचा बडगा उगारताच या कुटुंबास पुन्हा समाजात दाखल करून घेतले गेले होते. त्यामुळे, अशा प्रकरणांत पोलीस यंत्रणांनी कोणत्याही दबावास बळी न पडता कठोरपणे उभे राहून वाळीत कुटुंबांना न्याय द्यावा, असे साकडे आपण मुख्यमंत्र्यांना घालणार आहोत, असे मनोहर साबळे यांनी सांगितले.

वाळीत टाकल्यामुळे आपल्या घरातील तीन वयोवृद्ध माणसे भयभीत अवस्थेत असून कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो या भीतीने मुंबईत राहणाऱ्या आम्हालाही चिंतेने ग्रासले आहे.
-मनोहर साबळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2015 1:56 am

Web Title: social boycott progressive family members afraid in mumbai
टॅग Boycott
Next Stories
1 माहिती आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
2 भोंदूबाबाला अटक
3 आत्मविश्वासाला अभ्यासाची जोड हवी
Just Now!
X