दिशा खातू

हळदीकुंकू समारंभात पर्यावरणपूरक वस्तू, पुस्तकांची भेट; अनाथाश्रमांत उपयोगी वस्तूंचे वाटप

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने होणारे हळदीकुंकू समारंभ म्हणजे महिलावर्गाचे हक्काचे संमेलन. अशा सोहळय़ांत एकमेकींच्या भेटीगाठी करतानाच वाण म्हणून भेटवस्तू देण्याची प्रथाही आवर्जून पाळली जाते. मात्र, या पारंपरिक प्रथेची जपणूक करतानाच त्यातून समाजाचे भानही राखण्याचे प्रयत्न अलीकडच्या काळात केले जात आहेत. संक्रांतीचे वाण म्हणून कापडी पिशव्या, मातीची भांडी, अशा पर्यावरणपूरक वस्तू किंवा पुस्तके देण्याला अधिकाधिक महिला प्राधान्य देत आहेत.

एवढेच नव्हे तर, नेहमीच्याच मैत्रिणी किंवा नातलगांमध्ये हळदीकुंकू समारंभ साजरा करण्याऐवजी सफाई कामगार महिला, अनाथाश्रम, वृद्धाश्रम येथे हे सोहळे आयोजित करण्यात येत आहेत. यानिमित्ताने महिलांमध्ये विविध विषयांवर प्रबोधन करणारे कार्यक्रमही आयोजित करण्यात येत आहेत.

संक्रांतीचे वाण म्हणून प्लास्टिकच्या वस्तू देण्याची एक प्रथाच गेल्या काही वर्षांत पडली होती. या वस्तू स्वस्त आणि गृहोपयोगी असल्याने महिलावर्गाचे प्राधान्य त्यांनाच असे. मात्र, गतवर्षी प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर अशा वस्तू मिळेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे कापडी पिशव्या वाण म्हणून देण्यावर भर दिला जात आहे. यंदा कागदी आणि कापडी पिशव्या वाण म्हणून देणार असल्याचे बँकेत काम करणाऱ्या मालिनी सावळे यांनी सांगितले. या पिशव्या एका सामाजिक संस्थेतील गतिमंद मुलांनी तयार केल्या आहेत.

मुलुंडमध्ये राहणाऱ्या गृहिणी मुकुंदा सावंत यांचे सासर मालवणचे आहे. तिथे मातीच्या वस्तू बनवणारे अनेक कारागीर आहेत. त्यांना हातभार मिळावा यासाठी हळदीकुंकू समारंभात त्या कारागिरांनी बनविलेली ताटे, वाटय़ा, पेले, साठवणूक करता येण्यासारखे झाकण नसलेले डबे अशा विविध मातीच्या वस्तू देतात. या वर्षी त्या शेगडीवरही वापरता येईल असा मातीचा छोटा तवा देणार आहेत.

वाचनसंस्कृती मागे पडू नये. समाजातील महिलांना चांगल्या सवयी लागाव्यात या उद्देशाने दरवर्षी पुस्तक वाण म्हणून देण्याची सुरुवात केली, असे प्राध्यापिका श्यामल कुलकर्णी म्हणाल्या. मागच्या वर्षी सिंधुताई सकपाळांचे चरित्र दिले होते. या वर्षी भारतीय संस्कृतीवरील पुस्तके देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. हळदीकुंकू समारंभ घरकाम करणाऱ्या महिला, संकुलातील कचरा उचलणाऱ्या महिलांबरोबरही साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरुषांचाही सहभाग

गोराई पट्टय़ातील सर्व महिला आणि पुरुष संक्रांतीमध्ये एकत्र येतात. धान्य, डाळी, शाळेच्या वस्तू, चादरी इत्यादी गोष्टी संकलित करतात. प्रत्येक वस्तू विभागवार वेगळ्या करून त्यांचे पॅकिंग केले जाते. मग संक्रांतीच्या काळात या वस्तू विविध अनाथाश्रमांना देण्यात येते. ट्रकच्या ट्रक गोराईतून अनाथाश्रमांमध्ये जातात, असे बोरिवली येथील गोराई प्रतिष्ठानचे सचिव शेखर शिंदे यांनी सांगितले.

समारंभांतून समाजप्रबोधन

अंधेरीच्या महाकाली भागातील संस्कृती प्रतिष्ठानतर्फे गेल्या पाच वर्षांपासून हळदीकुंकू करीत आहेत. दर वर्षी समारंभामध्ये एक विषय घेऊन त्यावर प्रबोधन केले जाते. यंदा प्लास्टिक बंदी कशी अमलात आणावी या विषयावर प्रबोधन होणार आहे, अशी माहिती संगीता नलावडे यांनी दिली. तर योगिता खुटले यांनी यंदा सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्याचा निर्धार केला आहे. ‘मासिकपाळीबाबत जागृती नसते. त्यासाठी गावातील महिलांना मासिकपाळीचे महत्त्व या काळात समजावून सांगणार आहे,’ असे त्या म्हणाल्या.