देशात सामाजिक अशांतता निर्माण झाली असून, त्याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी सोमवारी देशभर एक दिवसाचे उपोषण केले. राज्यात सर्व जिल्ह्य़ांच्या पक्ष मुख्यालयांच्या ठिकाणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उपोषण केले. भाजपची जातीयवादी पक्ष अशी निंदा करीत, काँग्रेसपासून दुरावलेल्या दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांना जवळ करण्याचा पक्षाचा प्रयत्न सुरू आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथे उपोषण करण्यात आले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, विलास मुत्तेमवार, प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत, संजय दत्त, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी खासदार एकनाथ गायकवाड, हुसेन दलवाई, वर्षां गायकवाड, आदींच्या उपस्थितीत राज्यभर उपोषण करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

भाजपच्या द्वेषाच्या राजकारणामुळे देशातील सामाजिक सलोखा धोक्यात आल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली. भाजपशासित राज्यांमध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांवर मोठय़ा प्रमाणावर हल्ले केले जात आहेत. त्यातील भाजप व संघ कार्यकर्त्यांचा सहभाग उघड होऊनही त्यांच्यावर कारवाई होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात सत्तेच्या राजकारणासाठी दलित व मराठा समाजात फूट पाडण्याचा भाजपचा डाव होता, असा आरोप त्यांनी केला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजप जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करील, त्याबद्दल कार्यकर्त्यांना सावध राहण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला. भाजपच्या िहसेला काँग्रेस अहिंसेने उत्तर देऊन, समाजात शांतता, सलोखा व बंधुत्वाची भावना कायम राखण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.  दलित, आदिवासी, अल्पसंख्याक हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जातो. परंतु मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हाच मतदार भाजपकडे वळल्याने कॉंग्रेसला मोठे नुकसान सहन करावे लागले. आता निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्या पाश्र्वभूमीवर मोदी सरकारच्या विरोधात उपोषणाच्या निमित्ताने भीमा कोरेगाव प्रकरण, भारतबंदमध्ये झालेला हिंसाचार, दलितांवरील अत्याचार हे विषय घेऊन दुरावलेल्या दलित, अल्पसंख्याक समाजाला पुन्हा जवळ करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे मानले जाते.